उद्धव ठाकरे यांचे संग्रहित छायाचित्र पीटीआय
महाराष्ट्र

मविआसाठी विधान परिषद आव्हानात्मक; ९ जागांसाठी लवकरच निवडणुकीची घोषणा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेतील ९ सदस्यांची मुदत येत्या १३ मे रोजी संपत आहे. या ९ जागांसाठी देशाच्या निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाईल.

Swapnil S

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेतील ९ सदस्यांची मुदत येत्या १३ मे रोजी संपत आहे. या ९ जागांसाठी देशाच्या निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाईल. विधान परिषद निवडणुकीतील गुप्त मतदानामुळे ही निवडणूक विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीसाठी आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे आघाडीला मतांचे गणित जमवून उमेदवार निश्चित करावे लागणार आहेत.

उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी ९ सदस्यांची विधान परिषदेची मुदत १३ मे २०२६ रोजी संपत आहे. या ९ जागांसाठी एप्रिल महिन्यात निवडणूक अपेक्षित आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता नाही. कारण गुप्त मतदानामुळे या निवडणुकीत मतांची फाटाफूट शक्य आहे. विधान परिषदेच्या गेल्या दोन निवडणुकीत आघाडीची मते फुटली होती. त्यामुळे आघाडीसमोर आमदारांची एकजूट राखण्याचे आव्हान असणार आहे. विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता, विधान परिषद निवडणुकीत उमेदवाराला पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी जवळपास २८ मते लागतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचे मिळून विधानसभेत ४६ आमदार आहेत. आघाडीने विधान परिषदेच्या दोन जागा लढवण्याचा निर्णय घेतला तर आघाडीला अन्य छोट्या पक्षांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागेल. त्याचवेळी आघाडीची मते फुटणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागेल. विधानसभा निवडणुकीनंतरच्या सत्ताधारी पक्षाकडून या पहिल्याच निवडणुकीत आघाडीच्या मतांना सुरूंग लावण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे मविआसाठी परिषदेची निवडणूक अग्निपरीक्षा ठरणार आहे.

काँग्रेस, ठाकरे गट प्रत्येकी एका जागा लढणार?

विधान परिषदेच्या ९ जागांपैकी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट प्रत्येकी एक जागा लढण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पाठिंबा दिला आणि बिनविरोध निवडून आणले. त्यामुळे शरद पवार गटाकडून विधान परिषद निवडणुकीत उमेदवार दिला जाण्याची शक्यता नाही. दरम्यान, विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांना सध्या चालू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निरोप दिला जाणार आहे.

विधान परिषदेतून निवृत्त होणारे सदस्य

उद्धव ठाकरे (शिवसेना ठाकरे गट), डॉ. नीलम गोऱ्हे (शिवसेना शिंदे गट), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी अजित पवार गट), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी शरद पवार गट), राजेश राठोड (काँग्रेस), रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय केनकर, संदीप जोशी आणि दादाराव केचे (भाजप)

पुण्यातील सर्वात मोठ्या स्मशानभूमीला इराण-इस्रायल युद्धाचा फटका! गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद, महापालिकेचा निर्णय

GMLR प्रकल्पातील बाधितांसाठी आनंदाची बातमी! महिनाअखेरीस कांजूरमार्ग येथे मिळणार नवी घरे

म्हाडा मुंबईची २५०० घरांची सोडत महिनाअखेरीस; पत्राचाळीतील घरे यंदाच्या लॉटरीतून वगळणार; एप्रिल महिन्यात प्राप्त अर्जांची लॉटरी

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर BMW कारचा भीषण अपघात; प्रसिद्ध उद्योगपती वल्लभ महेश्वरी यांचा मृत्यू

'रुचिता हे डिझर्व्ह नव्हती करत'! बिग बॉस मराठी ६ मधील एलिमिनेशनवर चाहत्यांची नाराजी