मुंबई : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला होता. विधान परिषदेतही तीन जागांवर विजय मिळणार, असा विश्वास मविआकडून व्यक्त केला जात होता. मात्र, शुक्रवारी विधिमंडळात पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाल्याने विधान परिषदेत महायुती अभंग राहिल्याचे दिसून आले. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना दुसऱ्या पसंतीची मते मिळाल्याने त्यांचा विजय झाला. तसेच काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव यांना २५ मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या. मात्र, शरद पवार यांनी पाठिंबा दिलेले जयंत पाटील (शेकाप) यांच्या पारड्यात फक्त १२ मते पडल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
लोकसभेच्या निकालानंतर विधान परिषदेच्या निवडणूक निकालावरही परिणाम होऊन महायुतीला दगाफटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत असतानाच प्रत्यक्षात विधान परिषद निवडणूक निकालात महायुतीचे सर्व नऊ उमेदवार विजयी झाले. महायुतीचे आठ उमेदवार पहिल्याच फेरीत विजयी झाले, तर नववा उमेदवार सदाभाऊ खोत दुसऱ्या फेरीची १२ मते घेऊन विजयी झाले. या शंभर टक्के विजयामुळे महाविकास आघाडीच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले. या विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. ११ जागांसाठी ११ उमेदवार उभे केले जाण्याची शक्यता होती. मात्र, उद्धव ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने १२ वा उमेदवार रिंगणात आल्याने निवडणूक अटळ बनली आणि खऱ्या अर्थाने या निवडणुकीला रंगत आली. शेवटी मिलिंद नार्वेकर विजयी झाले, पण दुसऱ्या पसंतीचे मते घेऊन. पहिल्या फेरीत त्यांना २२ मते मिळाली. तर दुसऱ्या पसंतीचे ३ मते घेऊन ते विजयी झाले.
निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी गुरुवारी आमदारांना हॉटेलमध्ये बंदिस्त करण्यात आले होते. हॉटेल डिप्लोमसी खेळण्यात आली होती. मात्र, हे मतदान गुप्त पद्धतीने असल्याने त्यांच्या मतांवर कोणीही निर्बंध घालू शकत नव्हते आणि तसेच झाले. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाची दोन आणि काँग्रेसची दोन मते फुटल्याचे सांगण्यात येत आहेत.
शरद पवार गटाला धक्का
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला खो दिल्याचे दिसून येत आहे. मतांचा कोटा पूर्ण असतानादेखील महायुतीने महाविकास आघाडीची मते पळवली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
महाविकास आघाडीचे केवळ तीन उमेदवार होते. यापैकी काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव यांचा विजय झाला आहे. तर ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर पहिल्या पसंतीची २२ आणि दुसऱ्या पसंतीची काँग्रेसची ३ मते घेऊन विजयी झाले. या निवडणुकीत शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला. त्यांना केवळ १२ मते मिळाली. त्यांना आठ मते मिळताच आपले भविष्य ओळखून त्यांनी मतमोजणी केंद्र सोडले.
अजित पवारांनी काँग्रेसची ५ मते फोडली
या निवडणुकीत काँग्रेसची पाच मते फुटल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार गटाकडे ४२ मते होती. पण अजित पवार गटाला ४७ मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसची ५ मते फोडण्यात अजित पवार गटाला यश मिळाले. याबाबत काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सूचक वक्तव्य केले होते. आपल्या पक्षाची तीन-चार मते फुटतील, असे कैलास गोरंट्याल उघडपणे म्हणाले होते.
भाजपचे विजयी उमेदवार
-पंकजा मुंडे – २६ मते
-परिणय फुके – २६ मते
-सदाभाऊ खोत – २६ मते
-अमित गोरखे – २६ मते
-योगेश टिळेकर – २६ मते
राष्ट्रवादी अजित पवार गट
-शिवाजीराव गर्जे – २३ मते
-राजेश विटेकर – २४ मते
शिवसेना शिंदे गट
-कृपाल तुमाने – २५ मते
-भावना गवळी – २४ मते
काँग्रेस
-प्रज्ञा सातव – २५ मते
शिवसेना ठाकरे गट
-मिलिंद नार्वेकर – २४ मते