PTI
महाराष्ट्र

पावसाचे धूमशान सुरूच! पुणे, रायगड, नाशिक येथे पावसाची जोरदार बॅटिंग

महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा जोर पकडला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुरुवारी मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक जिल्ह्यात पावसाचे धूमशान सुरू होते.

Swapnil S

मुंबई/पुणे/नाशिक : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा जोर पकडला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुरुवारी मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक जिल्ह्यात पावसाचे धूमशान सुरू होते.

कोकण पट्ट्यातील रायगड जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून दमदार पाऊस सुरू असून खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला गुरुवारी ऑरेंज अलर्ट जारी केल्याने जिल्हा प्रशासनाने सर्वच शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असल्यामुळे खडकवासला धरणातून २ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नाशिकमधील गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंड, गोदा घाटाचा परिसर पाण्याखाली गेला आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेला रस्ता तब्बल १० फूट खचला आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बदलापूरजवळील बारवी धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात दुप्पट पाणीसाठा जमा झाला आहे. बारवी धरण ४३ टक्के भरले असून आतापर्यंत या धरणात ७८९ मिमि पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात तलावातील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांत सात तलावातील पाणीसाठ्यात १७,०४० दशलक्ष लिटरने वाढ झाली आहे. सात तलावात एकूण ४ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे.

अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या वातावरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. यामुळे पुढील पाच दिवस विविध जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गुरुवारी सकाळीच राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. पालघर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर गुरुवारी काही ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला होता. कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज होता. पुणे, नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड आणि जालना जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसासाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला होता.

मुंबईत अतिमुसळधार, पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा

हवामान विभागाने मुंबईला अतिमुसळधार पावसाचा तर पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील २४ ते ४८ तासांमध्ये या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर अधिक असल्याने सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे. या कालावधीत मुंबईतील उपनगरात सर्वाधिक पावसाची शक्यता आहे. तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांतही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. विदर्भ आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील ४ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video