"निवडणुक आयोगाने थेट बोली लावूनच..."; नगरपरिषद निवडणुकांवर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया  
महाराष्ट्र

"निवडणुक आयोगाने थेट बोली लावूनच..."; नगरपरिषद निवडणुकांवर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांदरम्यान बोगस मतदार आणि पैसे वाटपाचे आरोप करण्यात आले आहेत. अशातच, रोहित पवारांनी निवडणूक आयोगावर भाजपाला मदत करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

किशोरी घायवट-उबाळे

महाराष्ट्रातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसह विविध ठिकाणच्या १४३ सदस्यपदांसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच, अंबरनाथ, नांदेडसह विविध भागांत बोगस मतदार आणणे आणि मतदानासाठी पैशांचे वाटप झाल्याच्या आरोपांमुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी (२० डिसेंबर) निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली आहे. “भाजपाला सत्ता मिळवून देण्याच्या मोहात अडकलेला निवडणूक आयोग ध्रुतराष्ट्राप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून बसलाय,” असा आरोप त्यांनी केला.

अंबरनाथच्या कोहोजगाव परिसरात पहाटेच्या सुमारास मोठ्या संख्येने महिला व पुरुष एका सभागृहात आढळून आल्याने गोंधळ उडाला होता. हे बोगस मतदार असल्याचा आरोप झाला. याच मुद्द्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, "अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने बोगस मतदार आणल्याचा आरोप भाजप करत आहे, तर दुसरीकडे भाजपच्या उमेदवारांकडून मतदारांना पैसे वाटताना काही जण पकडले गेले."

तर, नांदेडच्या धर्माबादमध्ये पैशांचे आमिष दाखवून मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “लोकशाहीचं वस्त्रहरण सुरू असताना निवडणूक आयोग शांत बसलेला दिसतो,” अशी टीका त्यांनी केली.

पुढे ते म्हणाले, "हे असंच चालायचं असेल तर निवडणुक आयोगाने निवडणुका घेण्याचा फार्स न करता थेट बोली लावूनच भाजपाच्या नगरसेवकांना विजयी घोषित करावं आणि त्यांच्या विजयाच्या जल्लोषात सहभागी होऊन गुलाल अंगावर घ्यायलाही हरकत नाही! यामुळं किमान निवडणुकीसाठी खर्च होणारा सरकारी तिजोरीतील पैसा तरी वाचेल." असे म्हणत रोहित पवारांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला.

दरम्यान, रोहित पवारांच्या टीकेवर भाजपकडून काही उत्तर दिलं जातंय का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘मनरेगावर बुलडोझर’; नाव बदलावरून सोनिया गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय; महाविकास आघाडीत फूट

India T20 World Cup Squad : सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची धुरा; गिलला संघातून डच्चू

Thane : ठाणेकरांना मिळणार काशीचा अनुभव; नववर्षाच्या पूर्वसंध्येला तलावपाळीवर गंगा आरतीचे आयोजन

"हा अवॉर्ड आईसाठी!" जीवनातला पहिला-वहिला पुरस्कार स्वीकारताना आर्यन खानची प्रतिक्रिया; गौरी खाननेही खास पोस्ट करत केले कौतुक