महाराष्ट्र

राज्यात २० जिल्ह्यांतील नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या; नव्याने अर्ज दाखल करण्याची मुभा, सुधारित कार्यक्रमानुसार २० डिसेंबरला मतदान

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून २ डिसेंबर रोजी मतदान होणार असताना अचानक निवडणूक आयोगाने राज्यातील २० हून अधिक जिल्ह्यांतील नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.

Swapnil S

मुंबई : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून २ डिसेंबर रोजी मतदान होणार असताना अचानक निवडणूक आयोगाने राज्यातील २० हून अधिक जिल्ह्यांतील नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.

याबाबत शनिवारी रात्री उशिरा राज्य निवडणूक आयोगाने आदेश जारी केले. यामध्ये पुणे, सातारा, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, धाराशिव, नांदेड आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये बारामती, फलटण, महाबळेश्वर, अंबरनाथ, कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासा, पाथर्डी, मंगळवेढा, तळेगाव, लोणावळा, मुखेड, धर्माबाद, भोकर, दिग्रस, पांढरकवडा, वणी, अंजनगाव सुर्जी, गोंदिया, घुग्गुस, गडचांदूर आदी प्रमुख नगरपालिकांचा समावेश आहे.

पुढे ढकललेल्या नगरपालिकांसाठी आयोगाने सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून २० डिसेंबर रोजी त्यासाठी मतदान होईल, असे स्पष्ट केले आहे.

राज्यातील नगरपालिकांसाठी ४ नोव्हेंबर रोजी निवडणूक जाहीर करण्यात आली. त्यानुसार अर्जाची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात व्यथित उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. जे अपील दाखल झाले होते. त्याचा निर्णय २२ नोव्हेंबरपर्यंत येणे अपेक्षित होते. जेणेकरून व्यथित उमेदवारांना न्याय मिळाला असता परंतु जिल्हा न्यायालयात दाखल प्रकरणात २३ नोव्हेंबर रोजी किंवा त्यानंतर आदेश पारित झालेल्या प्रकरणात नियमांचे पालन झाले नसल्याचा ठपका आयोगाने ठेवला आहे. त्यामुळे काही नगरपालिकांच्या थेट नगराध्यक्ष व सदस्यांच्या जागेसाठी सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया स्थगित करत त्या ठिकाणी नवा सुधारित कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. यात न्यायालयात गेलेल्या सर्व उमेदवारांना नव्याने अर्ज दाखल करणे शक्य होणार आहे.

आता २० डिसेंबर रोजी मतदान

ज्या नगरपालिकांची निवडणूक संबंधित पदासाठी स्थगित केली आहे. त्या ठिकाणावरील निवडणूक घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने नव्याने सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. आयोगाने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. स्थगित केलेल्या पालिका क्षेत्रात आचारसंहिता पुढील निवडणुकीपर्यंत कायम राहील. स्थगित केलेल्या पालिकांसाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी ४ डिसेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जारी करतील. त्यानुसार १० डिसेंबरला दुपारी ३ पर्यंत उमेदवारांना स्थगित जागेवर अर्ज दाखल करता येतील. तर, ११ डिसेंबर रोजी निवडणूक चिन्हाचे वाटप करून पात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करावी लागेल. त्यानंतर २० डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल, तर २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल. २३ डिसेंबर रोजी निकाल प्रसिद्ध होईल.

नवी मुंबई विमानतळावर प्रवासी चाचणी यशस्वी; २५ डिसेंबरपासून उड्डाणांना हिरवा कंदील

आंध्रात ‘दितवाह’ चक्रीवादळामुळे जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; ‘एसआयआर’वरील चर्चेवर विरोधक ठाम

मुंबईच्या अतिखराब हवेला बांधकाम, वाहन प्रदूषण जबाबदार; IIT चे हवामान शास्त्रज्ञ अंशुमन मोदी यांचा आरोप

महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकींचा विद्रूप चेहरा