नवी मुंबई : महाराष्ट्रातील नोटरींसाठी महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला असून, आता नोटरी मुद्रांक तिकिटे राज्यातील प्रत्येक उपकोषागारात उपलब्ध होणार आहेत. लेखा व कोषागारे संचालनालयाच्या कोकण विभागाकडून बुधवारी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले.
या निर्णयामुळे आतापर्यंत केवळ मुंबईतील मुख्य मुद्रांक पुरवठा कार्यालयातून तिकिटे घेण्यासाठी करावी लागणारी पळापळ अखेर संपणार आहे. ग्रामीण भागातील आणि उपनगरातील नोटरींना या तिकिटांसाठी प्रवास व वेळेचा मोठा खर्च सहन करावा लागत होता.
महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा निर्णय संभवला आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष सय्यद सिकंदर अली यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाध्यक्ष ॲड. नागेश हिरवे आणि सहकाऱ्यांनी संबंधित विभागाशी सतत पाठपुरावा केला होता. याबाबत माहिती देताना असोसिएशनचे प्रवक्ते आणि कोकण विभागाध्यक्ष ॲड. समीत राऊत म्हणाले, नोटरी स्टॅम्प मिळवण्यासाठी अनेकांना मुंबईपर्यंत जावे लागत होते. उपकोषागारांमधून ही सुविधा सुरू झाल्याने हजारो नोटरींचा वेळ व खर्च वाचणार आहे.