जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एकनाथ खडसे यांनी महाजन यांचे महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यासंदर्भात अमित शहा यांच्याकडे कॉल रेकॉर्ड असल्याचा दावादेखील खडसे यांनी केला आहे. दरम्यान, या आरोपांवर गिरीश महाजन यांनीही प्रत्युत्तर दिलेय. ‘एकनाथ खडसे यांनी त्यांच्याकडील एक पुरावा तरी लोकांना दाखवावा’, असे आव्हान महाजन यांनी खडसे यांना दिले आहे.
एकनाथ खडसे काय म्हणाले?
एकनाथ खडसे यांनी एका पत्रकाराने व्हायरल केलेल्या क्लिपच्या आधारे गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘एका पत्रकाराने आपली एक क्लिप प्रकाशित केली आहे. त्यात असे म्हटले आहे की, गिरीश महाजन यांच्या 'रंगल्या रात्री अशा'. त्यात त्यांनी सविस्तर सांगितले आहे की, गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत. तिचे नाव मला माहीत आहे. पण ते सांगणे उचित होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे’, असे खडसे म्हणाले. "अमित शहा यांच्याकडे ज्या वेळेस मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा झाली. त्यावेळेस अमित शहा यांनी गिरीश महाजन यांना बोलावून घेतले व त्यांना सांगितले की, महिला आयएएस अधिकाऱ्यांशी तुझे संबंध आहेत. यावेळी महाजनांनी सांगितले की नाही, माझे अनेकांशी कामानिमित्त संबंध आहेत. कामानिमित्त मी बोलतो. त्यावर अमित शहा यांनी त्यांना सांगितले की, तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडे आहेत. रात्री एक वाजेनंतर दिवसभरात शंभर-शंभर कॉल तुझे झालेले आहेत. त्यामुळे तू आता काहीही सांग. पण, तुझे सीडीआर खरे बोलते. रोज बोलण्याचे काय कारण आहे? असे प्रश्न एका पत्रकाराने शहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन उपस्थित केले", असे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
खडसेंचे सगळे संपले, म्हणूनच ते असे बरळतात - महाजन
‘कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरे काही जमत नाही. त्यांची अवस्था किती वाईट आहे, हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे मी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. मी बोललो तर त्यांना बाहेर पडणे मुश्किल होईल. मी जर त्यांच्याच घरातील एका गोष्टीचा खुलासा केला तर त्यांना तोंड काळ करुन फिरावे लागेल. पण मी बोलणार नाही, मला बोलायला भाग पाडू नका असा इशारा महाजन यांनी दिला. तसेच, त्यांचे सगळे संपलेले आहे. त्यांचे दुकान बंद झालेले आहे, त्यामुळे ते वाटेल तशी भाषा करतात आणि बरळतात, असा पलटवारही महाजन यांनी एकनाथ खडसेंवर केला.