फडणवीस, शिंदेंमध्ये शह-काटशह; ...आता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची स्थापना संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

फडणवीस, शिंदेंमध्ये शह-काटशह; ...आता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची स्थापना

मुंबई : फडणवीस-शिंदे-अजित पवार सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची सूत्रे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली आणि सत्ताधाऱ्यांमध्ये एकमेकांना शह-काटशह देण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे.

Swapnil S

मुंबई : फडणवीस-शिंदे-अजित पवार सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची सूत्रे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली आणि सत्ताधाऱ्यांमध्ये एकमेकांना शह-काटशह देण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. आता फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाला टक्कर देण्यासाठी नवा उपमुख्यमंत्री सहाय्यता वैद्यकीय कक्ष शिंदेंमार्फत येत्या ४ मार्चला स्थापन करण्यात येणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येत्या ४ मार्च रोजी उपमुख्यमंत्री सहाय्यता वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन होणार आहे. विशेष म्हणजे हा कक्ष मंत्रालयातच पहिल्या मजल्यावर असणार आहे. हा ‘उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष’ मुख्यमंत्री सहाय्यता विभागाशी संबंधित नसेल तर हा विभाग थेट आरोग्य खात्याशी संबंधित असणार आहे. सध्या शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर हे आरोग्य मंत्री आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने याआधीच एक वैद्यकीय कक्ष सुरू असताना, हा दुसरा वैद्यकीय कक्ष नेमका कशासाठी? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

फडणवीस आणि शिंदे यांच्यातील ‘कोल्ड वॉर’ आता लपून राहिलेले नाही. शिंदेंच्या मंत्र्यांच्या विभागात भाजपचा वाढलेला हस्तक्षेप, मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिंदेंनी सुरू केलेल्या योजना बंद करणे, पालकमंत्रिपदाचा अद्याप न सुटलेला तिढा, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला अनेकदा शिंदेंनी मारलेली दांडी यावरून दोन प्रमुख नेत्यांमध्ये आलबेल नसल्याचे दिसून येते. त्यातच आता मुख्यमंत्र्यांवर कुरघोडी करण्यासाठी शिंदेंनी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

फडणवीस राज्याच्या सर्वोच्च पदी विराजमान झाल्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता विभागाच्या अध्यक्षपदावरून शिंदेंचे विश्वासू मंगेश चिवटे यांना काढून टाकण्यात आले आणि त्यांच्या जागी आपल्या मर्जीतील कार्यकर्त्याची नेमणूक करण्यात आली. मात्र, आता शिंदेंच्या वैद्यकीय कक्षाचे अध्यक्ष हे मंगेश चिवटेच असतील.

“उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष हा राज्य सरकारची योजना असलेल्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास मदत करणार आहे. हा कक्ष रुग्णांना थेट आर्थिक मदत पुरवणार नाही, तर मुख्यमंत्री सहाय्यता विभाग तसेच धर्मादाय रुग्णालय, राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम आणि केंद्राच्या आयुष्मान भारत योजनेद्वारे ही मदत कशी मिळवता येईल, याबद्दल लोकांना मार्गदर्शन करणार आहे. आरोग्य योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळतील, याची खात्री करण्यासाठी हा कक्ष एक दुवा म्हणून काम करणार आहे,” असे चिवटे यांनी स्पष्ट केले. असे असले तरी फडणवीसांना टक्कर देण्यासाठी शिंदेंनी समांतर वैद्यकीय कक्ष सुरू केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

जनतेची कामे कमी, कुरघोड्या जास्त - रोहित पवार

या सरकारमध्ये जनतेची कामे कमी आणि एकमेकांवर कुरघोड्याच जास्त दिसत आहेत. प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे स्वतंत्र कक्ष स्थापन झाले आहेत. सरकारमधील तिन्ही पक्षांच्या या कुरघोड्या बघता, सरकारने आपले ब्रीदवाक्य ‘कुरघोड्या हीच आमची प्राथमिकता’ असे करायला हरकत नाही. गरज पडल्यास प्रत्येक खात्याचे तीन मंत्री, प्रत्येक जिल्ह्याला तीन पालकमंत्रीसुद्धा करून घ्यावेत. म्हणजे ‘कुरघोड्यांमध्ये महाराष्ट्र सरकार थांबणार नाही’, शिवाय नाराजांची नाराजीदेखील दूर होईल, असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास