महाराष्ट्र

सौरऊर्जा प्रकल्पातील समस्या निवारणासाठी टास्क फोर्स; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश; सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा

शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणारा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० हा राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

Swapnil S

मुंबई : शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणारा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० हा राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. २०२५ वर्षात सात हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे. १०० दिवसांना ६९० मेगावॅटचा लक्ष्यांक केंद्र सरकारने दिलेला असताना राज्यातील विकासकांनी ७४६ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती केली. यामध्ये दिलेल्या मुदतीपेक्षा अगोदर लक्ष्यांक पूर्ण केला आहे. मात्र अजूनही काही ठिकाणी विकासकांना वन, पर्यावरण, सुरक्षेबाबतच्या अडचणी असल्याने जिल्हास्तरावर टास्क फोर्स तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे दिले.

सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे उपस्थित होते.

कामात अडथळा, तर थेट कारवाई

मुख्यमंत्री कृषी सौरऊर्जा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. विविध गावात राजकीय पदाधिकारी, ग्रामस्थ, गुंड प्रवृत्तीचे लोक कामात अडचणी आणत आहेत. मात्र ते कोणत्याही पक्षाचे असले तरी थेट कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

ग्रामपंचायतीच्या ना हरकतची गरज नाही

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी गावातील खासगी किंवा शासकीय जमिनीबाबत राज्य शासनाने ना हरकत दिली असल्याने पुन्हा ग्रामपंचायतीच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. याबाबत सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

खासगी जमीन घेतानाही मुद्रांक शुल्क माफ

मुख्यमंत्री कृषी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारने सरकारी जमिनीसाठी मुद्रांक शुल्क माफ केले आहे. आता खासगी जमीन घेतानाही मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. याबाबत विकासकांनी मागणी केली होती.

दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज

सौर ऊर्जा योजनेच्या अंतर्गत राज्यात ठिकठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून त्याच्या आधारे सर्व कृषी फिडर चालविण्यात येणार आहेत. राज्यात १५ हजार २८४ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे काम सुरू आहे. एकूण १६ हजार मेगावॅट क्षमतेचा हा जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. आतापर्यंत राज्यात १,३५९ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प पूर्ण झाले असून त्यामुळे २ लाख १४ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होऊ लागल्याची माहिती अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी सादरीकरणाद्वारे दिली.

प्रकल्प व्यवस्थापन पोर्टलचे अनावरण

सौर कृषी वाहिनी योजना प्रकल्प विकासकांना परवाने देण्यापासून ते वीज निर्मिती बिलांच्या पेमेंटपर्यंत सर्व कामांची प्रभावीपणे देखरेख करता यावी, यासाठी महावितरणच्या सोलर ॲग्रो कंपनीने 'प्रकल्प व्यवस्थापन पोर्टल' विकसित केले आहे. पोर्टलचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा ‘तो’ विक्रम; सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याबाबत नेहरूंनंतर दुसऱ्या स्थानी

न्या. वर्मांवरील महाभियोग प्रस्ताव प्रथम लोकसभेत मांडणार

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; ट्रेलरचा ब्रेक फेल; १५ ते १६ वाहनांना धडक

शाळेचे छत कोसळून ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दिल्लीत भेटीगाठीचे सत्र