मुंबई : मानवी वस्तीत वाघ, बिबट्यासह अन्य वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून मनुष्यावर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या १० महिन्यांत वाघ, बिबट्या यांसह वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती राज्याच्या वन विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांत वाघाच्या हल्ल्यात २५० तर बिबट्यांच्या हल्ल्यात ८७ अशा एकूण ३३७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती उघडकीस आली आहे.
वाघ, बिबट्या रानडुकरे, कोल्हे, रानगवा या प्राण्यांचा जिल्हा, तालुका आणि आता शहरी भागात मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. मानवी वस्तीत वाघ, बिबट्या, रानडुकरे, कोल्हे, तरस, अस्वल, लांडगा, माकड खोकड या प्राण्यांचा शिरकाव वाढत असून मनुष्य व पशुपक्ष्यांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पाच वर्षांत वाघ, बिबट्या, रानडुकरे, कोल्हे, तरस, रानगवा या प्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल ३७७ जणांचा मृत्यू झाला आहे, ल्याची धक्कादायक माहिती राज्याच्या वन विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. दरम्यान, वाघाच्या हल्ल्यात मानवाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत करण्यात येते, असे वन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
प्राण्यांच्या वस्तीत माणसांची घुसखोरी
मुंबई शहरांसह राज्याचा विकास झपाट्याने होत असून मानवाने प्राण्यांच्या वस्तीत घुसखोरी केली आहे. त्यामुळे सहाजिकच प्राण्यांचा लोकवस्ती वावर वाढला आहे. जंगलातील झाडांची खुलेआम कत्तल होत असून प्राणी आपले जीवन जगण्यासाठी मानवी वस्तीत पलायन करत आहेत. राज्यात गेल्या काही वर्षात वाघांच्या हल्ल्या पाठोपाठ बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. त्यामुळे आता मानव-वाघ संघर्षासोबत मानव -बिबट्या संघर्षात वाढ झाली आहे. राज्य सरकारच्या वन विभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी प्राण्यांच्या वस्तीत मानवाची घुसखोरी याला कारणीभूत आहे, असे प्राणीप्रेमींचे म्हणणे आहे.
मृत्यूची आकडेवारी
वर्ष २०२१-२२ दरम्यान वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ८४ जणांचा मृत्यू झाला.
वर्ष २०२२-२३ मध्ये ही संख्या वाढून १०९ वर पोहोचली.
वर्ष २०२३-२४ मध्ये मानव मृत्यूची संख्या ६३ इतकी नोंदवली गेली.
वर्ष २०२४-२५ दरम्यान ६८ जणांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी पडल्याची नोंद आहे.
तर २०२५-२६ या चालू वर्षात आतापर्यंत ५३ मृत्यू नोंदवले गेले आहेत.