छायाचित्र (एएनआयच्या व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट)
महाराष्ट्र

मंत्रालयात नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदार आक्रमक; तिसऱ्या मजल्यावरुन संरक्षक जाळीवर मारल्या उड्या (Video)

Swapnil S

धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करुन आरक्षण देण्यास विरोध करण्यासाठी आणि रखडलेल्या 'पेसा' भरतीसाठी आज (दि.०४) विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह सत्ताधारी महायुतीच्या आदिवासी आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. झिरवळ यांच्यासह दोन आदिवासी आमदारांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन संरक्षक जाळीवर उडी घेत आंदोलन केलं. या प्रकारामुळे मंत्रालयात काही वेळ खळबळ उडाली होती. लगेचच पोलिसांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढले.

प्राथमिक माहितीनुसार, आपल्या मागण्यांसाठी आदिवासी आमदारांचे शिष्टमंडळ मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र ही बैठक निष्फळ ठरल्यामुळे हे आमदार आक्रमक झाल्याचे समजते. त्यानंतर झिरवळ यांच्यासह हिरामण खोसकर आणि किरण लहामाटे यांनी तिसऱ्या मजल्यावरुन संरक्षक जाळीवर उडी घत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या थोडावेळ आधीच मुख्यमंत्री आमचे ऐकणार नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार असल्याचा इशारा झिरवळ यांनी दिला होता.

आदिवासी प्रवर्गात समावेश करुन म्हणजेच अनुसूचित जमातीअंतर्गत धनगरांना आरक्षण देऊ नये आणि आदिवासी तरुणांची पेसा कायद्यांतर्गत रखडलेली भरती करण्याची मागणी त्यांची आहे. यावेळी, पेसा कायद्यांतर्गत रखडलेली भरती करण्याची मागणी करत आदिवासी तरुण अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. आदिवासी मुलांनी काही बरं वाईट करू नये यासाठी आम्ही हे पाऊल उचलल्याचं झिरवळ यांनी सांगितलं. मी आधी आदिवासी आहे, नंतर विधानसभेचा उपाध्यक्ष अन् आमदार आहे, असे पत्रकारांना सांगताना झिरवळ यांना अश्रू अनावर झाले होते. दुसरीकडे, सत्ताधारी आमदारांनाच न्याय मिळत नसेल तर जनतेला या सरकारने अडीच वर्षात काय न्याय दिला असेल, अशी टीका विरोधकांकडून होत आहे.

आजि सोनियाचा दिनु...मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

जातीवर आधारित भेदभावाचे कारागृह नियम SC कडून रद्द, राज्यांना नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी ३ महिन्यांची मुदत

वाढत्या धमकावण्यांमुळे मुस्लीम समाज धास्तावलाय : अबू आझमी; सपा १२ जागांसाठी आग्रही

दसरा मेळाव्याला विरोधकांचा फडशा पाडणार, उद्धव ठाकरेंचा महायुतीला इशारा; ‘मशाल हाती घे, सत्वर भूवरी ये’ गाण्याचे अनावरण

भारताचे मिशन टी-२० वर्ल्डकप! महिलांची सलामीची लढत आज