आता महाराष्ट्रातही मतदार तपासणी; सोळा राज्ये व तीन केंद्रशासित प्रदेशांचा कार्यक्रम जाहीर 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

आता महाराष्ट्रातही मतदार तपासणी; सोळा राज्ये व तीन केंद्रशासित प्रदेशांचा कार्यक्रम जाहीर

निवडणूक आयोगाने गुरुवारी महाराष्ट्रासह १६ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्रचना (एसआयआर) मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली.

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने गुरुवारी महाराष्ट्रासह १६ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्रचना (एसआयआर) मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली. यामध्ये ३६.७३ कोटी मतदारांचा समावेश असून, ३० मे पासून टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया सुरू होणार आहे. दिल्लीसह कर्नाटक, मेघालय, महाराष्ट्र आणि झारखंडची अंतिम मतदार यादी ७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.

महाराष्ट्र, दिल्ली, ओदिशा, मिझोराम, सिक्कीम, मणिपूर, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरयाणा, चंदीगड, तेलंगणा, पंजाब, कर्नाटक, मेघालय, झारखंड, नागालँड, त्रिपुरा, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम राबवली जाईल. यामध्ये पंजाब, झारखंड, कर्नाटक आणि तेलंगणा ही विरोधी पक्षांची सत्ता असलेली राज्ये आहेत.

मतदारयाद्यांच्या ताज्या पुनर्रचना मोहिमेदरम्यान ३.९४ लाखांहून अधिक बूथ पातळीवरील अधिकारी (बीएलओ) ३६.७३ कोटी मतदारांच्या घरोघरी जाणार आहेत. मतमोजणी आणि नोंदणीच्या टप्प्यात राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले ३.४२ लाख बूथ पातळीवरील एजंट (बीएलए) त्यांना मदत करतील. बर्फाच्छादित भागातील हवामानाची स्थिती लक्षात घेऊन हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील मोहिमेचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल, असे निवडणूक आयोगाने एका पत्रकात म्हटले आहे.

तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाख वगळता संपूर्ण देश या मोहिमेत समाविष्ट होईल. सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या गृह नोंदणीच्या प्रक्रियेसोबत क्षेत्रीय यंत्रणांचा समन्वय साधून तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. ही १६ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांची अंतिम मतदार यादी या वर्षी वेगवेगळ्या तारखांना प्रसिद्ध केली जाणार असून त्याची सुरुवात ६ सप्टेंबर रोजी ओडिशा, सिक्कीम, मिझोराम आणि मणिपूरपासून होईल आणि २३ डिसेंबर रोजी त्रिपुराने सांगता होणार आहे.

विशेष सखोल पुनर्रचना मोहिमेच्या या ताज्या टप्प्याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतदारांना आवाहन केले आहे की, सर्व मतदारांनी या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात सहभागी होऊन आपले नोंदणी अर्ज भरावे. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात नऊ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांच्या एकत्रित मतदार यादीतून ६० लाखांहून अधिक मृत मतदारांची नावे वगळण्यात आली असून मतदार यादी १०.२ टक्क्यांनी कमी झाली आहे.

निवडणूक आयोगाने गेल्या वर्षी २७ ऑक्टोबर रोजी दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली तेव्हा या १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण मतदार संख्या ५०.९९ कोटींहून अधिक होती. या प्रक्रियेनंतर मतदार यादी ४५.८१ कोटींवर आली असून त्यात ५.१८ कोटींहून अधिक घट झाली आहे. टक्केवारीच्या दृष्टीने मतदार यादी १०.२ टक्क्यांनी घटली आहे.

मान्सूनने महाराष्ट्र घेतला कवेत; १४ जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’

दोडक्या बहिणींकडून वसुलीची प्रक्रिया सुरू

चुका केल्या, पण कारणे तांत्रिक; नार्वेकरांचा खुलासा

Mumbai : पहिल्याच पावसात पोलखोल! सखल भागात साचले पाणी; रेल्वे, रस्ते वाहतूक विस्कळीत; महापौरांच्या देखतच मुकादम पडला उघड्या मॅनहोलमध्ये

लग्न करायचे नव्हते तर सियाने तसे का सांगितले नाही? केतन अगरवालच्या वडिलांचा शोकसंतप्त सवाल