महाराष्ट्रात परत एकदा अवकाळी पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाकडून आजपासून राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस येण्याची शक्यता आहे. तर 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी मुंबईसाठी 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
25 आणि 26 नोव्हेंबर रोजी मुंबईकरांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. एवढंच नव्हे तर, या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. तसंच मुंबईत पावसाचा अंदाज असल्याने हवा गुणवत्ता पातळी चांगली होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता तर उत्तर महाराष्ट्रात देखील विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. सोबतच, उत्तर महाराष्ट्रात अगदी तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात आली आहे. रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांचा पुन्हा अवकाळीशी सामना होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला उद्यापासून 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्याला 24 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. या काळात जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम हा आंबा पिकावर होण्याची शक्यता आहे.
या राज्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवली जातं आहे
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम देशातील हवामानावर होताना दिसून येत आहे. राज्यासह देशातील वातावरणात बिघाड झाला आहे. येणाऱ्या 24 तासांत देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज आणि उद्या अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. केरळ, माहे, अंदमान आणि निकोबार बेटांवर आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये वेगळ्या ठिकाणी लक्षणीय पावसाची नोंद झाली आहे. तर आज कोझिकोड, तिरुवनंतपुरम, कोट्टायम, इडुक्की, केरळचे त्रिशूर आणि तामिळनाडूच्या नागापट्टिनम, थुथुकुडी, कराईकलमध्ये पावसाची शक्यता आहे.