मुंबई : राज्यात गेले काही दिवस अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून २१ जिल्ह्यांतील ८६ तालुक्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. गेल्या १५ दिवसांत अवकाळी पावसामुळे राज्यातील सुमारे २२,८७९ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी व्यक्त केला. दरम्यान, राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू असून अहवाल आल्यानंतर शासनाच्या धोरणाप्रमाणे बाधितांना नुकसानभरपाई देण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन विभागाकडून सांगण्यात आले.
अमरावतीला सर्वाधिक फटका
अवकाळी पावसाने, वादळी वाऱ्यांनी आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १० हजार ६३६ हेक्टर क्षेत्रावर परिणाम झाला असून मूग, संत्रा, कांदा, ज्वारी, केळी या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याखालोखाल जळगाव जिल्ह्यात ४ हजार ३९६ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन मका, ज्वारी, बाजरी, भाजीपाला, कांदा, केळी यासह अनेक पिकांना फटका बसला. नाशिक जिल्ह्यात १,७३४ हेक्टर क्षेत्रावर, जालना जिल्ह्यात १,६९५ हेक्टर, तर चंद्रपूरमध्ये १,०३८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून मका, धान, फळपिके यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय पालघर ७९६ हेक्टर, धुळे ६४५ हेक्टर, गडचिरोली ३४२ हेक्टर, वाशिम २०३ हेक्टर, बुलढाणा १८१ हेक्टर, यवतमाळ १७८ हेक्टर गोंदिया १४३ हेक्टर, भंडारा ७५ हेक्टर, नागपूर ४२, परभणी ४१ हेक्टर, नंदुरबार २८ हेक्टर तर सर्वात कमी ठाणे १ हेक्टर, पुणे ५ हेक्टर, रायगड १७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
या पिकांचे नुकसान
प्रमुख हंगामी फळपिके : आंबा, केळी, संत्रा, पपई, तसेच भात, मका, बाजरी, कांदा, भाजीपाला यांना मोठा फटका बसला आहे. काही जिल्ह्यांत मूग, उडीद, भुईमूग यांसारख्या कडधान्य पिकांचीही हानी झाली आहे.
या जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा धुमाकूळ
पालघर, रायगड, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्या नगर, पुणे, जळगाव, जालना, परभणी, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली.