संग्रहित छायाचित्र पीटीआय
महाराष्ट्र

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

Swapnil S

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्यानंतरही महाविकास आघाडी किंवा महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटू शकलेला नाही. आघाडी किंवा युतीतील प्रमुख तीन पक्षांमध्ये जागावाटपासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महायुतीचा जागावाटपाचा चेंडू दिल्लीदरबारी असला तरी महाविकास आघाडीमध्ये मात्र जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठकांचे सत्र सुरू आहे. मुंबईतील सोफिटेल हॉटिलमध्ये झालेल्या बैठकीत मविआच्या नेत्यांमध्ये जवळपास २६० जागांवर एकमत झाले आहे. आता २८ जागांवर तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच असली तरी महाविकास आघाडीचे जागावाटप एक-दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी मविआने जागावाटपात सरशी साधली होती, वेळे आधीच उमेदवार जाहीर केल्यामुळे त्यांना तयारीलाही वेळ मिळाला होता, त्याचा मोठा फायदा त्यांना झाला होता. आता लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत लवकरच जागावाटप जाहीर करण्याचा मविआचा मानस आहे. मुंबईतील जागांवरून शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि कांग्रेस यांच्यात धुसफूस असताना, आता मुंबईतील जागावाटपाचाही तिढा सुटल्याची माहिती मिळत आहे.

२९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्यामुळे मविआने जागावाटपावर फार अडून न बसता लवकरात लवकर हा तिढा सोडवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यामुळेच गुरुवारी सोफिटेल हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत जवळपास २६० जागांवर मविआच्या नेत्यांमध्ये एकमत झाले आहे. या बैठकीत शिवसेनेचे (उबाठा गट) संजय राऊत, अनिल परब, अनिल देसाई तसेच काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, विजय वडेट्टीवर, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील तसेच राष्ट्र‌वादीकडून (शरद पवार गट) जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे नेते उपस्थित होते.

झिशान सिद्दीकीविरोधात वरुण सरदेसाई

एकीकडे जागावाटपाचा तिढा सुटलेला नसतानाच, शिवसेना ठाकरे गटाने वांद्रे पूर्व मतदार संघातून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी आणि वरुण सरदेसाई अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात यासंदर्भात घोषणा केली. काही दिवसांपूर्वीच मी उद्धव ठाकरें साहेबांना भेटलो आहे. त्यांनीच वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाईंच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. असे अनिल परब यांनी सांगितले.

विधानसभेला काँग्रेस मोठा भाऊ

लोकसभेला मविआमध्ये शिवसेना ठाकरे गट मोठा भाऊ ठरला होता, मात्र काँग्रेसचे १३ खासदार निवडून आले, तर ठाकरे गटाचे ९ उमेदवार जिंकले. त्यामु‌ळे विधानसभेला काँग्रेस मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे. त्याखालोखाल शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवर पक्षाला जागा मिळण्याची शक्यता आहे. मविआतील घटक पक्षांनाही जागावाटपात सामावून घेण्यात आले आहे. जिथे विद्यमान आमदार तिथे त्या पक्षाचा उमेदवार असे जागावाटपाचे सूत्र असले तरी काही ठिकाणी जागांची अदलाबदल करण्यात आली आहे.

वांद्रे पूर्वची जागा ठाकरे गटाला

मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघात काँग्रेसचे झिशान सिद्दीकी निवडून आले होते. मात्र ती जागा आता ठाकरे गटाला सोडण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीत झिशान सिद्दीकी यांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे आढळून आल्याने त्यांना उमेदवारी मिळणे शक्य नव्हते. दरम्यान, झिशान यांचे वडील बाबा सिद्दीकी हे सहा महिन्यांपूर्वी अजित पवार गटात गेले होते. त्यांची नुकतीच बिष्णोई गँगच्या मारेकऱ्यांनी हत्या केली. या पार्श्वभूमीवर झिशान सिद्दीकी यांची पुरती कोंडी झाली आहे.

मुंबईतील ३३ जागांवर एकमत

मुंबई आणि शिवसेना में जणू समीकरणच बनले आहे. त्यामुळे मुंबईतील जास्तीत जास्त जागा शिवसेनेला मिळाव्यात, हा ठाकरे गटाचा आग्रह होता. सर्वाधिक जागा मिळवण्यासाठी ठाकरे गटाने कडक भूमिका घेतली. आता मुंबईतील ३६ पैकी ३३ जागांवर एकमत झाले असून शिवसेना ठाकरे गटाला २१, काँग्रेसला ८, राष्ट्रवादी शरद पवार गटाला ३ आणि अबू आझमी यांच्या समाजवादी पार्टीला १ जागा देण्यावर सहमती झाली आहे. कुर्ला, भायखळा आणि अणुशक्तीनगर या जागांवरील पेच अद्याप कायम आहे.

काँग्रेसची पहिली यादी २० ऑक्टोबरला

गुरुवारी किंवा शुक्रवारी महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर होऊ शकते, असे बैठकीनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी २० ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. ८४ जणांबाबत उमेदवारी निश्चित झाली असून २० तारखेला पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे, त्याचदिवशी उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

निकालानंतर मुख्यमंत्री ठरवू - शरद पवार

मुख्यमंत्रीपदासाठी निवडणुकीचा निकाल तर लागू द्या, मग त्यासंदर्भात बोलू. आता चर्चा करणे योग्य नाही, आमजासाठी तो विषय संपला आहे, असे म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबत अधिक बोलणे पुन्हा एकदा टाळले. शिवस्वराज्य यात्रा मोहिमेचा सांगली येथे समारोप झाल्यानंतर कराड मुक्कामी शरद पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले को, २०० जागांवर एकमत झाले असून उर्वरित जागांचा तिढा गुरुवार, शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत सुटेल. जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांच्यावरच मोठी जबावदारी आहे. मनोज जरांगे-पाटील यांचा विधानसभा निवडणुका लढण्याचा निर्णय झाल्यानंतरच त्याविषयी बोलता येईल, असेही त्यांनी नमूद केले,

'मेरिट 'नुसार जागावाटप - अनिल देशमुख

महाविकास आघाडीचे जागावाटप ९० टक्के फायनल झाले आहे. उवरित १० टक्के जागावाटपाचा तिढा शुक्रवारी सुटणार असून, 'मेरिट' नुसार जागावाटप करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी दिली.

जागावाटपाबाबत हायकमांडकडे चर्चा - पटोले

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा जवळपास सुटाला आहे. २६० जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित जागांवर निर्णय लवकरच होईल. तिन्ही पक्षाच्या हायकमांडकडे याबाबत चर्चा केली जाईल आणि पुढील दोन दिवसांत जागावाटप जाहीर होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता

२०१९च्या निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपची पहिली यादी १८ ऑक्टोबरला म्हणजेच शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुतीत भाजप मोठा भाऊ ठरल्याने ते १५०पेक्षा जास्त जागांवर उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने आयत्या वेळी उमेदवार जाहीर केल्याचा मोठा फटका त्यांना बसला होता, त्यामुळेच सर्वांआधी उमेदवार जाहीर करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. जेणेकरून उमेदवारांना तयारीसाठी तसेच मतदारांच्या भेटीगाठीसाठी अधिक वेळ मिळू शकेल. भाजपच्या पहिल्या यादीत राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, नितेश राणे, संजय कुटे, संभाजी पाटील निलंगेकर, आशिष शेलार, राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश असेल. भाजप १०० टक्के विजयाची खात्री असणाऱ्या उमेदवारांचीच नावे पहिल्या यादीतून जाहीर करण्याची शक्यता आहे.

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा

न्या. संजीव खन्ना हे आपले उत्तराधिकारी; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली शिफारस