संग्रहित छायाचित्र, पीटीआय
महाराष्ट्र

सरकार चालविताना महायुती एकत्र, मात्र यात्रांबाबत वेगळी चूल...लवकरच राज्यभर तीन वेगवेगळ्या यात्रा

राज्यातील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष महायुतीचे सरकार चालविण्यासाठी एकत्र आलेले असले तरी अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या योजनांचा राजकीय लाभ उठविण्यासाठी काढण्यात येणाऱ्या यात्रांमध्ये मात्र महायुतीमध्ये वेगळी चूल मांडण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

रविकिरण देशमुख

मुंबई : राज्यातील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष महायुतीचे सरकार चालविण्यासाठी एकत्र आलेले असले तरी अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या योजनांचा राजकीय लाभ उठविण्यासाठी काढण्यात येणाऱ्या यात्रांमध्ये मात्र महायुतीमध्ये वेगळी चूल मांडण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

सत्तेमधील तीन पक्षांच्या वतीने लवकरच राज्यभर तीन वेगवेगळ्या यात्रा काढल्या जाणार असून अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या विविध योजनांमधून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

भाजपची ‘संवाद यात्रा’

भाजपची संवाद यात्रा ९ ते १३ ऑगस्ट अशी चार दिवसांची आहे, मात्र संघटनात्मक रचनेचा भाग म्हणून मंडल स्तरावर ७५० परिषदा घेतल्या जाणार आहेत आणि त्यामध्ये ३६ नेते सहभागी होणार आहेत, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर शहर-ग्रामीण आणि अमरावती येथे सहभागी होणार आहेत, तर बावनकुळे हे वर्धा आणि भंडारा येथे सहभागी होणार आहेत. राज्यातील सरकारने, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जाहीर केलेल्या घोषणांबाबत जनतेशी चर्चा केली जाणार आहे.

अजितदादा गटाची ‘चांदा ते बांदा यात्रा’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून ‘चांदा ते बांदा यात्रा’ काढली जाणार असून संपूर्ण राज्य पिंजून काढले जाणार आहे. युवकानी त्यासाठी पुढाकार घेतला असून शेतकरी, विद्यार्थी, युवक आणि महिलावर्ग यांच्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या घोषणांवर प्रकाशझोत टाकला जाणार आहे, असे सूरज चव्हाण या युवा नेत्याने सांगितले. यात्रा ७ ऑगस्टला सुरू होणार असून अजित पवार मोठ्या शहरांमध्ये त्यात सहभागी होणार आहेत.

शिंदे गटाची ‘लाडकी बहीण योजना सन्मान यात्रा’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन्मान यात्रा’ आयोजित केली असून त्यामध्ये राज्यभर महिलांचे मेळावे घेतले जाणार आहेत. एसटी बसगाड्यांमधून प्रवास करण्यासाठी महिलांना ५० टक्के देण्यात आलेली सवलत, उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण, ई-पिंक रिक्षा, ८०० अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती, आनंदाचा शिधा योजना, यावर आमचा प्रकाशझोत असेल असे पक्षाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी सांगितले. यात्रेची सांगता रक्षाबंधनाच्या दिवशी होणार आहे, असेही कायंदे म्हणाल्या.

जरांगेंचे ३ नोव्हेंबरला ठरणार; उमेदवार, मतदारसंघ जाहीर करणार

शिंदे, अजितदादा गटात भाजपच्या १६ नेत्यांची घुसखोरी!

सिंचन घोटाळा चौकशी फाईल गोपनीयतेचा भंग नाही; देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट

सत्तेसाठी एखाद्याचा पक्ष फोडणे अनुचित; शरद पवारांचे टीकास्त्र

दाऊदशी आपले नाव जोडणाऱ्यांना कोर्टात खेचणार; नवाब मलिक यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा