काजू पिकणार कोकणात, निर्यात केंद्र मात्र कोल्हापुरात! चंदगडमध्ये केंद्र उभारण्याचा प्रस्ताव 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

काजू पिकणार कोकणात, निर्यात केंद्र मात्र कोल्हापुरात! चंदगडमध्ये केंद्र उभारण्याचा प्रस्ताव

राज्यातील सर्वाधिक काजू उत्पादन कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यात होत असताना पहिली काजू बाजारपेठ, अत्याधुनिक नर्सरी, काजू निर्यात केंद्र, गोदाम आणि सेंटर ऑफ एक्सलन्स आदी सुविधा मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे उभारण्यात येणार आहेत.

Swapnil S

मुंबई : राज्यातील सर्वाधिक काजू उत्पादन कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यात होत असताना पहिली काजू बाजारपेठ, अत्याधुनिक नर्सरी, काजू निर्यात केंद्र, गोदाम आणि सेंटर ऑफ एक्सलन्स आदी सुविधा मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे उभारण्यात येणार आहेत.     

राज्यात मे २०२२ मध्ये काजू बोर्डाची स्थापना करण्यात आली. मात्र या मंडळाला स्वतःचे कार्यालय व अन्य सुविधा नव्हत्या. त्यामुळे मंडळाने राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे ४० एकर जागेची मागणी केली होती. त्यानुसार महामंडळाने चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे नाममात्र दरात ४० एकर जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.

या ठिकाणी काजू मंडळाचे विभागीय कार्यालय, अत्याधुनिक नर्सरी, काजूसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स, काजू प्रक्रिया प्रकल्प, काजू निर्यात केंद्र, अद्यावत गोदाम  तसेच देशातील पहिली काजू बाजार समिती उभारण्यात येणार आहे. वास्तवात राज्यात सर्वाधिक काजूची लागवड कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यात आहे आणि उत्पादनातही हे दोन्ही जिल्हे आघाडीवर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू लागवडी खालील क्षेत्र ८० हजार हेक्टरच्या पुढे गेले आहे. हापूस आंब्याच्या बरोबरीने काजू हे जिल्ह्यातील महत्वाचे नगदी पीक ठरले आहे. तुलनेने कोल्हापूर जिल्ह्यात आजरा गडहिंग्लज आणि चंदगड या तालुक्यातच काही प्रमाणात काजूची लागवड आहे.

उदय सामंत यांची उदासीनता?

या पार्श्वभूमीवर काजू बाजार समिती व अन्य सुविधा सिंधुदुर्ग - रत्नागिरी या जिल्ह्यांच्या सीमेवर होणे योग्य ठरणार आहे. वास्तवात औद्योगिक विकास महामंडळ उद्योग खात्याच्या अखत्यारीत येते व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हे या खात्याचे मंत्री आहेत. असे असूनही काजू बाजार समिती कोल्हापूरला जाणे हे सामंत यांच्या उदासीनतेचे लक्षण असल्याचे प्रदेश जनता दलाचे कार्याध्यक्ष प्रभाकर नारकर, पक्षाचे सिंधुदुर्ग - रत्नागिरीचे संघटन सचिव संजय परब तसेच कोकण जनविकास समितीचे सुरेश रासम, जगदीश नलावडे, दिनेश राणे यांनी म्हटले आहे.

जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाने आणि कोकण जन विकास समितीने याला विरोध केला असून या सुविधा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.

कोकण फक्त अणुऊर्जा प्रकल्पांसाठी?

कोकण हे अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर असून किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते. मात्र स्थानिक पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे मत्स्य विद्यापीठ कोकणात न होता किनारपट्टीपासून ८०० किलोमीटर अंतरावरील नागपूर येथे सुरू झाले आहे. तोच प्रकार काजू बाजारपेठ, काजू निर्यात केंद्र, सेंटर ऑफ एक्सलन्स आदीबाबतीत होत असल्याचे म्हटले जात आहे. कोकण हे केवळ रिफायनरी, अणुऊर्जा प्रकल्प, बॉक्साईटच्या खाणे यासाठीच आहे का, असा सवाल करून काजू बाजार व अन्य सुविधा सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातच व्हाव्यात, अशी मागणी हाेत आहे.

खत तुटवड्याचे मोठे संकट; खरीप हंगाम आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

NEET Paper Leak : लातूरचे डॉ. शिरूरे यांना अटक; नीट पेपरफुटी तपासाचा मोहरा आता डॉक्टरांकडे

पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार हमजा बुरहानची हत्या; पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी केला अंदाधुंद गोळीबार

Pune : वारकऱ्यांसंदर्भातील विधान; विकास लवांडे यांना अटक

कॉकरोच जनता पार्टीचा सोशल मीडियात धुमाकूळ