नागपूर : देशाला भेडसावणाऱ्या प्रश्नांपासून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक मंगळवारी सादर करण्यात आल्याची टीका शिवसेना (उबाठा) नेते उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी येथे केली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यापूर्वी पारदर्शक निवडणूक प्रक्रिया आणण्याची मागणीही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. निवडणूक आयुक्तांची निवडही निवडणुकीद्वारे करावी, असेही ते म्हणाले. निवडणुकीपूर्वी सरकारने लाडकी बहीण योजनेची रक्कम २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता सरकारने करावी, असे ते म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळात अनेक ज्येष्ठ नेत्यांना स्थान मिळाले नाही त्यावरून हे नेते नाराज असल्याबद्दलही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ज्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाले आहे त्यांच्या आनंदापेक्षाही ज्यांना स्थान मिळाले नाही त्यांचेच जास्त प्रतिध्वनी ऐकावयास मिळत आहेत, असे ठाकरे म्हणाले.
हे ‘ईव्हीएम’ सरकार
ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना स्थान मिळाले नाही, त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, त्याबद्दल आपल्याला दु:ख आहे. कारण त्यांच्यासारख्या बहुसंख्य जणांनी सरकारमध्ये सामील होण्यासाठी पक्ष बदलले. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊनही खातेवाटप न झाल्याबद्दलही ठाकरे यांनी टीका केली. फडणवीस सरकार हे ईव्हीएम म्हणजेच 'एव्हरी व्होट फॉर मशीन' सरकार आहे, असेही ते म्हणाले.