मुंबई : बहुचर्चित २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात जणांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने मोठा दिलासा दिला. अतिरिक्त न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी तपास यंत्रणेच्या तपासावर बोट ठेवत लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि भाजपच्या भोपाळ येथील माजी खासदार प्रज्ञासिह ठाकूर यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची निर्दोष मुक्तता केली. तब्बल १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने हा निर्णय दिला.
मालेगाव येथील मशिदीजवळ २९ सप्टेंबर २००८ रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन ६ जण ठार आणि १०० हून अधिक जखमी झाले होते. सुरुवातीला राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणाचा तपास केला होता. त्यानंतर, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, नंतर ‘एनआयए’कडे वर्ग केला गेला. तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ‘एनआयए’ने २०१६ मध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने आरोपींविरोधात यूएपीए कलम १६ (दहशतवादी कृत्य करणे) आणि १८ (दहशतवादी कृत्याचा कट रचणे), १२० (ब) (गुन्हेगारी कट), ३०२ (खून), ३०७ (खून करण्याचा प्रयत्न), ३२४ (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि १५३ (अ) (दोन धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) आदी भादंविच्या विविध कलमांसह दहशतवादाच्या आरोपांतर्गत आरोप निश्चित केले आणि खटल्याच्या नियमित सुनावणीला अखेर सुरूवात केली होती. सलग सात वर्षे सुनावणी झाली, पण त्यानंतर न्यायालयाने १९ एप्रिल २०२५ रोजी फिर्यादी आणि आरोपींचा युक्तिवाद पूर्ण झाल्याचे जाहीर करून खटल्याचा निर्णय राखून ठेवला होता.
संघाचा संबंध नाही - सरसंघचालक
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सातही आरोपींना निर्दोष मुक्त केल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांना याविषयी विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी या प्रकरणाचा संघाशी काहीही संबंध नाही, अशी मोजकीच प्रतिक्रिया व्यक्त केली. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले होते. संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी ‘एनआयए’ने न्यायालयाकडे केली होती. मात्र, विशेष न्यायालयाने निकाल देताना १७ वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
काँग्रेसने माफी मागावी - फडणवीस
विशेष ‘एनआयए’ कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे काँग्रेसप्रणीत तत्कालीन यूपीए सरकारच्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला. यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा, भगव्या दहशतवादाचा खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता, हे कोर्टाने पुराव्यानिशी सांगितले आहे. संपूर्ण हिंदू समाजाला दहशतवादी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
त्यांना देव शिक्षा देईल - साध्वी प्रज्ञा सिंह
न्यायालयाचा निर्णय हा भगव्याचा आणि हिंदुत्वाचा विजय आहे. तपास यंत्रणेने माझे जीवन बरबाद केले. प्रचंड छळ केला. १७ वर्षे खटला चालला. मला अनेक वेळा कलंकित करण्यात आले. त्यामुळे भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देव शिक्षा देईल, अशा शब्दांत साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
तपासाबाबत संशयकल्लोळ - न्यायालय
बॉम्ब ठेवण्यात आला, तो बाइकमध्ये नाही बाइकच्या बाहेर
बाइक कोणी आणली, त्यात बॉम्ब कोणी ठेवला, हे स्पष्ट नाही.
आरडीएक्सचा वापर करण्यात आला. ते आणले कुठून तसेच त्याची वाहतूक कशी झाली, कोणी केली, साठवून कोठे ठेवले, याबाबत तपासात काहीच आढळले नाही.
कर्नल पुरोहित बॉम्ब बनविण्याच्या प्रक्रियेत सहभागी असल्याचा पुरावा नाही.
साध्वीच्या मोटारसायकलचा स्फोट झाल्याचा आरोप आहे. पण ही मोटारसायकल तिच्या मालकीची असल्याचे सिद्ध करण्यात अपयश आले.
ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला त्या ठिकाणाहून वैज्ञानिक पुरावे जमा केले गेले नाहीत.
सनातनी दहशतवाद म्हणा - पृथ्वीराज चव्हाण
१७ वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचा निकाल काय लागेल, हे मला माहीत होते. २०० ते २५० साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यापैकी काहींनी साक्ष फिरवली. न्यायालयात ‘एनआयए’ने जी बाजू मांडली, त्याआधारे निकाल दिला गेला आहे. मी त्यांना निर्दोष म्हणणार नाही, तर पुराव्यांअभावी आरोपींना सोडण्यात आले आहे, स्फोट आपोआप झाला का? कट कुणी केला? आरडीएक्स कुणी आणले? एनआयए अमित शहा यांच्या नेतृत्वात काम करत आहे. त्यामुळे वेगळी काय अपेक्षा ठेवणार. हा भगवा दहशतवाद नसून, हिंदुत्ववादी दहशतवाद किंवा सनातनी दहशतवाद आहे. भगव्या रंगाला महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे, असे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.