महाराष्ट्र

लोकसभेसाठी जरांगे पाटलांची चाचपणी; गावागावांतील मत जाणून निवडणुकीचा निर्णय

निवडणूक लढवायची की नाही, याबद्दलचे मत टक्केवारी रुपात लिहून पाठवावे. मग यावर ३० मार्च रोजी निर्णय घेऊ, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्यामुळे ३० तारखेला जरांगे पाटील काय डाव टाकणार हे स्पष्ट होणार आहे.

Swapnil S

विशेष प्रतिनिधी/मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटीत महाबैठक घेतली. या बैठकीत लोकसभेच्या पर्यायापेक्षा विधानसभेत मराठा समाजाची ताकद दाखवून देऊ, असे सांगतानाच मी निवडणूक लढविणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, जर लोकसभा निवडणूक लढवायची असेल, तर मराठा समाजाने आपल्या गावात जाऊन मराठा समाजाची बैठक घेऊन चर्चा करावी. तसेच इतर समाजांनाही विश्वासात घ्यावे आणि त्यांचे जे काही मत आहे, ते जसेच्या तसे ३० तारखेपर्यंत कळवावे. तसेच निवडणूक लढवायची की नाही, याबद्दलचे मत टक्केवारी रुपात लिहून पाठवावे. मग यावर ३० मार्च रोजी निर्णय घेऊ, अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली. त्यामुळे ३० तारखेला जरांगे पाटील काय डाव टाकणार हे स्पष्ट होणार आहे.

लोकसभा निवडणुकीबाबत समाजाची भूमिका निश्चित करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे रामगव्हाण रोडवरील मैदानावर मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीला राज्यभरातून मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी लोकसभेबाबत प्रथम आपले मत मांडले.

ते म्हणाले की, माझे वैयक्तिक मत विचारात घेत असाल, तर आपण लोकसभा निवडणुकीच्या नादी न लागता विधानसभा निवडणुकीत त्यांना हिसका दाखवून देऊ. मी स्वत: निवडणुकीच्या मैदानात उतरणार नाही, असेही त्यांनी जाहीर करून टाकले. मात्र, जर समाजाला लोकसभा निवडणूकही लढवावी वाटत असेल, तर ते आपल्याला आताच घोषित करता येणार नाही किंवा जिल्हा कार्यकारिणीने ठरवूनही चालणार नाही, तर त्यासाठी मराठा बांधवांनी प्रथम आपापल्या गावांत जावे आणि तेथे मराठा समाजाची बैठक बोलावून ग्रामस्थांशी चर्चा करावी. एवढेच नव्हे, तर वेगवेगळ्या पक्षांत काम करणाऱ्या बांधवांनाही बोलावून घेऊन त्यांचे मत जाणून घ्यावे आणि ते जे काही बोलतील किंवा सांगतील, ते जसेच्या तसे माझ्याकडे लेखी स्वरुपात पाठवावे. तसेच हे करताना इतर समाजालाही विश्वासात घेणे फार गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांची मते कळवितानाच निवडणूक लढविण्याबाबतच्या दोन्ही बाजू ३० मार्चपर्यंत टक्केवारीत लेखी कळवाव्यात, म्हणजे आपल्याला पुढील निर्णय घेता येईल, असे जरांगे पाटील म्हणाले.

राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण जाहीर केले. परंतु आम्ही जी मागणी केली, त्याचा विचार झालेला नाही. राज्य सरकारने मराठा समाजातील सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जी अधिसूचना काढली होती. त्याची अंमलबजावणी केली गेली नाही. त्यामुळे सरकारने त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करीत असतानाच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मागील आंदोलनातील आंदोलकांचा शोध घेऊन जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी त्यांनी आता लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आता निर्णायक भूमिका घ्यावी लागेल, असे नमूद केले.

आता भावनिक निर्णय नको

लोकसभा निवडणुकीबाबत कुठलाही विचार न करता भावनिक निर्णय घेणे योग्य नाही. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाचा पराभव होता कामा नये. यासाठी सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे आपापल्या गावांत जाऊन बैठका घ्या आणि तुम्ही गावागावांतील म्हणणे कळविल्यानंतरच योग्य तो निर्णय घेऊ, असे जरांगे-पाटील यांनी सांगितले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक