जालना/मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलन मोडून काढण्यासाठी तसेच आपल्याला गप्प करण्यासाठी आणि आंदोलन कमकुवत करण्यासाठी कट रचण्यात आल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी गुरुवारी केला. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला ५०० कोटी रुपये दिल्याचा दावा करणारी कथित ऑडिओ क्लिप ऐकवत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही जरांगे यांनी केली. जरांगेंच्या या ५०० कोटींच्या बॉम्बमुळे दिवाळीआधीच राज्याच्या राजकारणात धमाका झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनी जरांगे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाची बदनामी करण्याचा हा कट असल्याचा दावा केला. या ऑडिओ क्लिपमधील संभाषण करणारे लोक भाजपचे असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, या क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी केली. या कथित कटामागे कोण आहे, हे स्पष्ट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सखोल चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी जरांगे यांनी केली.
कथित कटामागे कोण? याचा तपास करा...
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे यांनी कथित ऑडिओ क्लिप ऐकवली. या संभाषणातील व्यक्तींची ओळख पटवून कथित कटामागे कोण आहे, याचा तपास करण्याची मागणी त्यांनी केली. कथित संभाषणातील एका व्यक्तीने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जरांगे यांना ५०० कोटी रुपये आधीच पोहोचवण्यात आल्याचा दावा केल्याचे ऐकू येते. संभाषणाच्या दुसऱ्या भागात विधानसभा निवडणुकीत जरांगे यांचा प्रभाव पक्षासाठी फायदेशीर ठरेल का, यावर चर्चा झाल्याचेही सांगितले जाते.
जरांगेंचा प्रभाव रोखण्यासाठी रणनीती!
मराठवाड्यात जरांगे यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी कोणती रणनीती आखावी, यावरही या संभाषणात चर्चा झाल्याचे कथित क्लिपमधून समोर आले आहे. मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कर्जमाफी या मुद्द्यांवर जरांगे सातत्याने भूमिका मांडत असल्याचा उल्लेखही संभाषणात असल्याचे सांगितले जाते. एका व्यक्तीने जरांगे भाजपला मराठाविरोधी ठरवत असल्याचे ऐकू येते. तसेच, ओबीसी नेत्यांची भूमिका आणि त्याचे राजकीय परिणाम विचारात घेण्याची गरज असल्याचे संभाषणात नमूद असल्याचा दावा केला जात आहे. दुसऱ्या व्यक्तीने जरांगे वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत राहतील आणि त्यांच्या भूमिकेला विरोधकांना प्रत्युत्तर द्यावे लागेल, असे म्हटल्याचे कथितरित्या ऐकू येते.
जरांगे विरोधकांना एकत्र आणण्याची चर्चा
सदर संभाषणात मराठा नेत्यांशी संपर्क साधणे आणि जरांगे यांच्या विरोधात असलेल्या समाजातील लोकांना एकत्र आणण्याबाबतही चर्चा झाल्याचे सांगितले जाते. जरांगे यांना थेट विरोध करण्याऐवजी इतर व्यक्तींच्या माध्यमातून त्यांचा प्रभाव कमी करण्याची सूचना एका व्यक्तीने केल्याचा दावा आहे. जरांगे यांचा प्रभाव रोखला नाही, तर मराठवाड्यात ते पक्षावर राजकीयदृष्ट्या वरचढ ठरू शकतात, असा इशाराही संभाषणात दिल्याचे कथित क्लिपमध्ये म्हटले आहे.
आमदार जरांगेंविरोधात बोलत नाहीत...
पक्षातील आमदार जरांगे यांच्या विरोधात बोलण्यास तयार नसल्याचा उल्लेखही या संभाषणात असल्याचे सांगितले जाते. याशिवाय, राजकीय ध्रुवीकरणाला फायदा होऊ शकणाऱ्या ‘लव्ह जिहाद’ आणि ‘व्होट जिहाद’ यांसारख्या मुद्द्यांवर पक्षाकडून भूमिका मांडली जात नसल्याबाबतही चर्चा झाल्याचा दावा आहे. बीड येथे दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात जरांगे यांनी, भाजपच्या एका नेत्याने आपल्याला एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून ५०० कोटी रुपये मिळवले व ते आपले पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पुढे दिल्याचे सांगितल्याचा दावा केला होता. मात्र, बुधवारी शिंदे यांनी ५०० कोटी रुपये कोणीही दिलेले किंवा घेतलेले नाहीत, असे स्पष्ट केले. जरांगे यांनी आपला आरोप सिद्ध करून दाखवावा, असे आव्हानही त्यांनी दिले.
माझ्याकडे शिंदेंच्या मंत्र्यांचे कारनामे : जरांगे
माझ्याविरोधात बोलणाऱ्यांपैकी ७० टक्के लोकांना एकनाथ शिंदे यांचे लोक रसद पुरवतात आणि ३० टक्के देवेंद्र फडणवीस यांची माणसे ती पुरवतात. शिंदे साहेबांचे कोणते मंत्री कोणाला फोन करतात, कोण व्हॉट्सॲॅपवर बोलतो, कोणत्या क्लबमधून पैसे जातात, हे सगळे मला ठाऊक आहे. मी उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, प्रताप सरनाईक, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शहाजीबापू पाटील यांच्यासह अनेक आमदारांना आधीच सावध केले होते की, चुकीची माणसे हाताखाली धरून तुमचे राजकीय करिअर धोक्यात आणू नका, असा सल्लाही जरांगे यांनी दिला.
क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करा -उदय सामंत
दरम्यान, राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी या कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषण करणाऱ्या व्यक्ती भाजपमधील असल्याचा दावा केला. या क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करून संभाषणातील आवाज खरे आहेत की बनावट, याची पडताळणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. ‘ही ऑडिओ क्लिप खरी असेल, तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. या संभाषणाचा विषय केवळ श्रीकांत शिंदे यांच्यापुरता मर्यादित नाही. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेची बदनामी करण्याचा हा कट आहे. क्लिपमधील आरोप खरे ठरल्यास संबंधितांवर काय कारवाई करणार, हे भाजपने स्पष्ट करावे’, असे सामंत म्हणाले.
क्लिपमधील आवाज भाजपमधील नेत्यांचे -म्हस्के
मनोज जरांगेंनी ती क्लिप पोलिसांना, सायबर सेलला द्यावी. जरांगे आणि शिवसेना यांच्यात भांडण लावण्याचे काम कोण करतेय ते समोर येईल. या ऑडिओ क्लिपमधील आवाज भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनी, निधी कामदार आणि आमदार अतुल भातखळकर यांचे असल्याचे दिसतेय. हे आवाज त्यांचेच आहेत का? ही ऑडिओ क्लिप खरी आहे का? हे समोर आले पाहिजे. या सगळ्या षडयंत्रांच्या मागे कोण आहे, नक्की याच्या खोलापर्यंत जाण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांकडे आम्ही यासंदर्भात तक्रार करणार आहोत, असे शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.
५०० कोटींचा आरोप खोटा -शेलार
मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेली कथित ५०० कोटी रुपयांची ऑडिओ क्लिप पूर्णपणे खोटी, बनावट आणि तथ्यहीन आहे. या संभाषणाशी भाजपचा किंवा आमच्या कोणत्याही नेत्याचा काडीमात्र संबंध नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची पोलीस आणि सायबर यंत्रणांमार्फत सखोल चौकशी करावी, जेणेकरून या बनावट क्लिपमागील सत्य समोर येईल आणि हवेत फुगे उडवणाऱ्यांचा पर्दाफाश होईल, असे भाजपचे नेते ॲॅड. आशिष शेलार म्हणाले.
क्लिपची चौकशी करून शिंदेंना अटक करा - सपकाळ
मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ५०० कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपमधून भाजपचे कारस्थान उघडे पडले आहे. या क्लिपमध्ये थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची नावे असल्याने ईडीने या दोघांनाही तत्काळ अटक करून या संपूर्ण रॅकेटची चौकशी करावी. भाजपने हे ५०० कोटी कुठून आणले? त्याचे वाटप कसे झाले? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला.
लवकरच मोठा बॉम्ब टाकेन
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः या ३२ मिनिटांच्या क्लिपचा छडा लावावा. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी हे षडयंत्र आणि माझ्याविरोधात खोट्या टोळ्या पेरण्याचे काम थांबवले नाही, तर १-२ महिन्यांत असा बॉम्ब टाकेन की, २०२९च्या निवडणुकीत राज्यात एकालाही पाय ठेवायला जागा उरणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.
सरकार निष्पक्ष चौकशी करेल
जरांगे-पाटील यांनी जाहीर केलेल्या कथित ५०० कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपबाबत आणि त्यांना अडकवण्याच्या षडयंत्राबाबत जर त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील, तर त्यांनी केवळ माध्यमांत बोलण्यापेक्षा पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार नोंदवावी. सरकारकडे रितसर तक्रार आल्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहखाते संबंधित यंत्रणांमार्फत त्याची निष्पक्ष व सखोल चौकशी करेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, त्यांनी कोणालाही पैसे दिलेले नाहीत आणि घेतलेही नाहीत, अशी रोखठोक भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली आहे.
शिवसेना शिष्टमंडळ भेटले मुख्यमंत्र्यांना
मराठा आंदोलक मनोज जरांगे - पाटील यांनी ऐकविलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची सायबर सेल आणि फॉरेन्सिक लॅबमार्फत तत्काळ तपासणी करण्यात यावी. क्लिपची सत्यता, आवाजांची ओळख आणि संभाषणात काही फेरफार करण्यात आला आहे का? याची संबंधित व्यक्तींच्या आवाजाचे नमुने घेऊन शास्त्रीय पद्धतीने पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. कोणाचीही गय करण्यात येणार नसल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याची माहिती सचिन अहिर यांनी यावेळी दिली.