संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

एकाच नावाचे अनेक उमेदवार! राजकीय पक्षांच्या डावपेचांमुळे मतदारांच्या डोक्याला ताप

महाराष्ट्रातील यंदाची विधानसभा निवडणूक 'न भूतो, न भविष्यती' अशी होत आहे. भाजप, Maharashtra Assembly Elections 2024 : शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी आदी पक्षांसह किरकोळ अनेक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Swapnil S

मुंबई: महाराष्ट्रातील यंदाची विधानसभा निवडणूक 'न भूतो, न भविष्यती' अशी होत आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी आदी पक्षांसह किरकोळ अनेक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत एकाच नावाचे उमेदवार उभे करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे डावपेच राजकीय पक्षांकडून खेळण्यात आले आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊन मतांची मोठी फाटाफूट होण्याची शक्यता आहे.

राज्यातील निवडणुकीत ८ हजारांहून अधिक जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील ७,९९४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत केवळ तीन ते चार पक्ष मैदानात असत. यंदा मात्र अनेक पक्ष व त्यांचे चिन्ह असल्याने मतदार आधीच संभ्रमात सापडला आहे. त्यात आता राजकीय पक्षांनी नामसाधर्म्य असलेले अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे एकाच नावाचे तीन-तीन, चार-चार उमेदवार एकाच मतदारसंघात रिंगणात असतील. परिणामी, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम निकालावर होणार आहे.

तासगाव-कवठेमहांकाळमध्ये चार रोहित पाटील आणि दोन संजय पाटील

सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी रोहित पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात रोहित पाटील नावाच्या तीन व्यक्तींनी अपक्ष अर्ज भरला आहे, तर एका अपक्षाचे नाव संजय पाटील आहे. त्यामुळे मतदानावेळी एकूण चार रोहित पाटील आणि दोन संजय पाटील असे उमेदवार असतील.

पर्वतीमध्ये तीन अश्विनी कदम

पुण्यात पर्वती मतदारसंघात भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) अश्विनी कदम निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात अश्विनी कदम नावाच्या दोन महिलांनी अर्ज भरला आहे. त्यामुळे तीन अश्विनी कदम उमेदवार असतील. त्यातून मतदारांची फसगत होण्याची शक्यता आहे.

मुक्ताईनगर, इस्लामपूरमध्येही एका नावाचे अनेक उमेदवार

मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे गट) चंद्रकांत पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) उमेदवार रोहिणी खडसे यांच्यात थेट लढत होत आहे. या मतदारसंघात रोहिणी गोकुळ खडसे आणि रोहिणी पंडित खडसे नावाच्या दोन अपक्ष महिला आहेत. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील नावाच्या दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरला आहे.

इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील यांच्यात सामना होत आहे. या मतदारसंघात जयंत राजाराम पाटील व जयंत रामचंद्र पाटील या दोघांनी अपक्ष अर्ज भरला, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) निशिकांत पाटील यांच्या नावाशी जवळीक असणारे निशिकांत प्रल्हाद पाटील आणि निशिकांत दिलीप पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

इंदापूरात तीन हर्षवर्धन पाटील आणि दोन दत्तात्रय भरणे

इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे दत्ता भरणे विरुद्ध राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील अशी थेट लढत होत आहे. या मतदारसंघात हर्षवर्धन पाटील नावाचे दोन, तर दत्तात्रय भरणे नावाच्या एका व्यक्तीने अर्ज दाखल केला. इंदापुरात एकूण तीन हर्षवर्धन पाटील आणि दोन दत्तात्रय भरणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

कोरेगावात चार महेश शिंदे आणि दोन शशिकांत शिंदे

कोरेगाव विधानसभेत शिंदे गटाचे महेश शिंदे आणि शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे आमनेसामने आहेत. या मतदारसंघात महेश शिंदे नावाच्या तीन जणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे, तर एक अपक्ष अर्ज शशिकांत शिंदे नावाने दाखल आहे. कोरेगाव विधानसभेतून चार महेश शिंदे आणि दोन शशिकांत शिंदे असे उमेदवार आहेत.

तीन रोहित पवार, तीन राम शिंदे

कर्जत-जामखेड मतदारसंघात शरद पवार गटाचे रोहित पवार विरुद्ध भाजपच्या राम शिंदेंमध्ये लढत होईल. या मतदारसंघात दोन रोहित पवारांनी, तर दोन राम शिंदेंनी अपक्ष अर्ज दाखल केले. त्यामुळे तीन रोहित पवार आणि तीन राम शिंदे उमेदवार असतील.

काही तलवारी म्यान, तर काहींची धार कायम!एकूण २,९३८ उमेदवारी अर्ज मागे; ४,१४० उमेदवार रिंगणात

रश्मी शुक्ला यांची अखेर उचलबांगडी; मविआ नेत्यांच्या पाठपुराव्यानंतर निवडणूक आयोगाचे आदेश

मनोज जरांगे-पाटील यांची अचानक माघार; कोणत्याही पक्षाला, उमेदवाराला पाठिंबा नाही

८७ विधानसभा मतदारसंघांत दोन ईव्हीएम लागणार; राज्य निवडणूक आयोगाची माहिती

‘बेस्ट’च्या बोनससाठी महापालिकेचे ८० कोटी; आता निवडणूक आयोगाच्या परवानगीची प्रतीक्षा