शेतकऱ्यांवर पशुधन विक्रीची नामुष्की; चाऱ्याअभावी जनावरांचे दर २५ टक्क्यांनी घसरले  प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

शेतकऱ्यांवर पशुधन विक्रीची नामुष्की; चाऱ्याअभावी जनावरांचे दर २५ टक्क्यांनी घसरले

दुष्काळाच्या झळांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जगण्याचे गणितच बिघडवून टाकले आहे. पिके करपली, पाण्याचे स्रोत आटले आणि आता गोठ्यातील पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

प्रतिनिधी

सुजित ताजणे / छत्रपती संभाजीनगर

दुष्काळाच्या झळांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जगण्याचे गणितच बिघडवून टाकले आहे. पिके करपली, पाण्याचे स्रोत आटले आणि आता गोठ्यातील पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाणी आणि चारा टंचाईच्या भीतीने शेतकरी आपल्या गायी, म्हशी, शेळ्या आणि मेंढ्या बाजारात विक्रीसाठी आणू लागले आहेत. परिणामी पशुधनाच्या मागणीत घट झाल्याने काही बाजारपेठांमध्ये जनावरांच्या विक्रीदरात तब्बल २० ते २५ टक्क्यांची घसरण झाली आहे. वर्षानुवर्षे मुलांप्रमाणे जपलेल्या जनावरांना कमी दरात विकण्याची वेळ आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मराठवाड्यातील ७६ तालुक्यांमध्ये कमी पाऊस आणि प्रदीर्घ कोरड्या हवामानामुळे पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची समस्या तीव्र होत आहे. काही भागांत उपलब्ध हिरवा चारा केवळ एक ते दोन महिने पुरेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे चारा टंचाई आणखी तीव्र होण्यापूर्वीच शेतकरी पशुधन विकण्याचा मार्ग स्वीकारत आहेत.

जनावरे सांभाळणे अवघड

शेतकरी किशन जगमाले यांनी सांगितले, ‘आमच्या गाई पूर्वी २० लिटर दूध द्यायच्या. आता त्या दहा लिटरवर आल्या आहेत.चाऱ्याचा भाव १,५०० रुपयांवरून २,५०० रुपये टन झाला आहे. त्यामुळे जनावरे सांभाळणे दिवसेंदिवस अवघड होत आहे’.

‘चारा मिळाला नाही तर विक्री वाढणार’

पशुधन व्यापारी महेंद्र जहकर यांनी सांगितले, ‘दुष्काळामुळे जनावरांच्या बाजारावर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांकडे चारा आणि पाण्याची कमतरता असल्याने ते जनावरे विक्रीसाठी आणत आहेत. बाजारात जनावरांची संख्या वाढली असताना खरेदीदारांची संख्या त्या प्रमाणात नाही. त्यामुळे दरात घसरण झाली आहे. चारा आणि पाण्याची उपलब्धता वेळेत झाली नाही तर पशुधन विक्री आणखी वाढण्याची शक्यता आहे.”

पशुधन विक्रीत वाढ; दरही घसरले

दुष्काळाच्या काळात पशुधन हा शेतकऱ्याचा आधार मानला जातो. मात्र यंदा हाच आधार आर्थिक ओझे ठरत आहे. चाऱ्याचे वाढलेले दर, दूध उत्पादनातील घट आणि पशुखाद्याचा वाढलेला खर्च यामुळे अनेक शेतकरी जनावरे विकण्याचा निर्णय घेत आहेत. दुष्काळामुळे पशुधन विक्री वाढल्याने काही बाजारांमध्ये जनावरांच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी घसरल्याचे चित्र आहे. मागणी कमी आणि बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांची संख्या वाढल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याची स्थिती आहे.

‘जनावरे मुलांसारखी वाढवली; आता विकताना डोळ्यात पाणी’

‘मुलांप्रमाणे जीव लावून जनावरे वाढवली. त्यांच्या डोळ्यांत पाहून चारा घातला. आज त्याच जनावरांना बाजारात विकायला नेताना डोळ्यात पाणी येते. पण काय करणार? चारा घालण्यासाठी पैसेच उरले नाहीत,”अशी व्यथा एका शेतकऱ्याने व्यक्त केली. चारा, पशुखाद्य, औषधोपचार आणि जनावरांची देखभाल यावरील खर्च कायम किंवा वाढता आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर दुग्धव्यवसाय सुरू ठेवायचा की पशुधन विकायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

'ते' समाजकंटक नव्हेत, आंदोलन हा त्यांचा हक्क; MPSC विद्यार्थी आंदोलनावरून हायकोर्टाची राज्य सरकारला चपराक

... तर SIR थांबवणे शक्य; माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचे स्पष्ट मत

व्याजदर वाढीच्या झळा; रेपो दरात पाव टक्के वाढ, भविष्यात अधिक दरवाढीचे संकेत

मुख्यमंत्र्यांनी घेतली शहांची भेट; दुष्काळाबाबत भरीव मदत करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे आश्वासन