महाराष्ट्र

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवला आहे.

नेहा जाधव - तांबे

राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवला आहे. रात्रीपासून कोसळलेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत नद्या-नाले तुडुंब भरून वाहू लागले असून शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे.

शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

अतिवृष्टीमुळे शेतशिवार पाण्याखाली गेले असून पारंपरिक पिकांसह सोयाबीन, कापूस, तूर यांसारख्या नगदी पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. परभणीत वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कष्टाचे पीक डोळ्यांसमोर वाहून गेले. जालन्यात अनेक गावांमध्ये शेतीला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहेत.

गावांचा संपर्क तुटला

लातूर जिल्ह्यातील भेटा अंदोरा गावांचा संपर्क रात्रीपासून तुटला आहे. पावसाच्या पाण्याने पूल बुडाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गावकऱ्यांनी पुलाची उंची वाढवण्याची मागणी वारंवार केली असली तरी ती न झाल्याने यंदाही त्यांना पूरस्थितीचा फटका बसला आहे.

बाजारपेठेत पाणी; सिंदफणा नदीचे रौद्ररूप

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे मध्यरात्री दमदार पावसानंतर सिंदफणा नदीला प्रचंड पूर आला. त्यामुळे शहरातील बाजारपेठ व घरांमध्ये पाणी शिरले असून मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या भागात पाण्याचा विसर्ग वाढल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील स्थिती गंभीर

धाराशिवच्या भूम व परांडा तालुक्यातील चांदणी नदीने रौद्ररूप धारण केले असून घराघरांत पाणी घुसले आहे. परंडा तालुक्यातील जवळपास २०० ते ३०० नागरिक पूरपाण्यामुळे नदीच्या पलीकडे अडकले आहेत. या भागात मदतकार्य सुरू करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाकी नदीला पुन्हा पूर आला असून कन्नड व पैठण तालुक्यात अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. पैठण शहरालगतच्या राहुल नगर भागात शंभराहून अधिक घरांत पाणी शिरले आहे. तर, जालना जिल्ह्यातील घनसावंगी, बदनापूर व अंबड तालुक्यात शेत आणि रस्त्यांवर पाणीच पाणी दिसत आहे.

माजलगाव धरणाचे दरवाजे उघडले

दरम्यान, माजलगाव धरण क्षेत्रात झालेल्या प्रचंड पावसामुळे धरणाचे तब्बल ११ दरवाजे उघडण्यात आले असून सुमारे ६२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सिंदफणा नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

एकूण परिस्थिती पाहता, मराठवाड्यातील शेतकरी आणि नागरिकांना प्रचंड फटका बसला असून प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी होत आहे.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण

GDP अंदाजात ४० आधार अंकांनी वाढ; भारताच्या आर्थिक वर्ष २६ साठी ‘OECD’चे भाकीत