महाराष्ट्र

मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; इंदापूर, माणगांव चक्का जाम; शिमग्यामुळे चाकरमान्यांनी धरला गावचा रस्ता

कोकणातील होळीनिमित्त मुंबई शहर व उपनगरातून तसेच ठाणे, कल्याण या ठिकाणाहून चाकरमानी कोकणात आपापल्या गावी बुधवारी (दि.१२) रात्रीपासूनच विविध वाहनांच्या माध्यमातून जायला निघाले आहेत.

Swapnil S

नागोठणे : कोकणातील होळीनिमित्त मुंबई शहर व उपनगरातून तसेच ठाणे, कल्याण या ठिकाणाहून चाकरमानी कोकणात आपापल्या गावी बुधवारी (दि.१२) रात्रीपासूनच विविध वाहनांच्या माध्यमातून जायला निघाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी पहाटे पासून आमटेम ते नागोठणे फाटा तसेच पुढे इंदापूर ते माणगाव दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागली आहे. त्यामुळे शिमगोत्सवात महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

महामार्गावर कोकणात जाणाऱ्या वाहनांची बुधवारी रात्री पासूनच वर्दळ वाढली होती. मात्र वाहनांची संख्या अधिकच वाढल्याने गुरुवारी पहाटे पासूनच वडखळ पासून पुढे आमटेम ते नागोठणे फाटा तसेच कोलाड ते इंदापूर बायपास,माणगाव ते लोणेरेदरम्यान वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. या कोंडीमुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाचा सामना करावा लागला आहे.

वडखळ ते कोलाड, इंदापूर बायपास, माणगाव बाजारपेठ ते लोणेरे हायवे नाका इथपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कोलाड ते महाड या तासाभराच्या प्रवासाला अडीच ते तीन तास लागत असल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. तर दुसरीकडे मुंबईकडे जाणाऱ्यांना प्रवाशांना या वाहतूक कोंडीतून बाहेर पडून मुंबईला लवकर पोहोचण्याची घाई झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत वाहने चालवली जात आहेत. परिणामी, ही वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्ग वाहतूक पोलीस आणि ऐनघर व महाड येथील वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी ही कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, ही कोंडी सोडवायला पोलीस बळ कमी पडत असल्याचे दिसून येते, त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांची दमछाक होत असल्याचेही दिसत आहे.

चौपदरीकरणाच्या अर्धवट कामामुळे कोंडी

मुंबई गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर यादरम्यान सुरु असलेल्या पहिल्या टप्प्यातील नियोजन शून्य अर्धवट कामामुळे उत्सवात महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढल्याने प्रत्येक वेळी अशी वाहतूक कोंडी होते. त्याचा मनस्ताप प्रवाशांना वारंवार होत असतो. पहिल्या टप्प्यातील अर्धवट अवस्थेत असलेले आमटेम येथील उड्डाणपूल, नागोठणे येथील हॉटेल कामथ, मिरानगर तसेच हायवे नाका येथील उड्डाणपूल, कोलाड नाका येथील उड्डाणपूल यांसह अनेक ठिकाणी असलेल्या चौपदरीकरणाच्या नियोजन शून्य अर्धवट कामामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम मार्गी लावावी, अशी मागणी सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे संबंधित महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार या विषयांकडे गांभीर्यपूर्वक लक्ष केंद्रित करून चौपदरीकरणाचे काम मार्गी लावतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

होळी उत्सव तसेच सलग सुट्टयामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे आमटेम ते नागोठणे फाटा, इंदापूर, माणगाव या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. यावेळी ऐनघर पोलीस चौकीतील वाहतूक शाखेच्या पोलीसांनी आमटेम ते नागोठणे फाटा दरम्यान वाहतूक १२ वाजेपर्यंत सुरळीत केली असून याठिकाणी वाहतूक पोलीस तैनात आहेत. तर इंदापूर ते माणगाव दरम्यान प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून त्याठिकाणी ऐनघर व महाड वाहतूक चौकीतील पोलीस अधिकारी व कर्मचारी लवकरात लवकर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

- गीतांजली जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा ऐनघर

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती