महाराष्ट्र

१८ मार्चपासून माथेरान बंदचा इशारा; माथेरानवासीयांचा कडक पवित्रा; पर्यटकांची होते फसवणूक

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले तसेच तमाम पर्यटकांच्या नेहमीच आवडीचे असलेले माथेरान हे ठिकाण आहे.

Swapnil S

अलिबाग : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले तसेच तमाम पर्यटकांच्या नेहमीच आवडीचे असलेले माथेरान हे ठिकाण आहे. दरवर्षी लाखो पर्यटक माथेरानला भेट देत असतात, येथील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून माथेरान येणाऱ्या पर्यटकांची फसवणूक होण्याचे, त्यांना लूटण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम होत असल्याने आता माथेरानकरांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. पर्यटकांची होणारी लूट तातडीने थांबवा, अन्यथा १८ मार्चपासून माथेरान बंद करू, असा इशारा माथेरानवासीयांनी दिला आहे.

पर्यटकांकडून लुटीचे तसेच फसवणुकीचे प्रकार सध्या सोशल मीडियावर टाकू जाऊ लागले आहेत. त्यामुळे माथेरानच्या पर्यटनाला ओहोटी लागण्यास सुरूवात झाली आहे. या संदर्भात स्थानिक प्रशासनाने हस्तक्षेप करून पाऊले उचलावीत अशी मागणी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने केली आहे.

माथेरानला परमिट टॅक्सीने येणाऱ्या पर्यटकांना घाटाच्या पायथ्याशी अडवून नेरळ-माथेरान दरम्यान चालणाऱ्या टॅक्सी संघटनांकडून ५०० रुपयांचा टोल आकारला जातो. ही रक्कम देण्यास नकार दिल्यास पर्यटकांना खाली उतरण्यास भाग पाडले जाते. नंतर स्थानिक टॅक्सीने या पर्यटकांना वर माथेरानला जाण्यासाठी भाग पाडले जाते. बेकायदेशीरपणे होणारी ही वसूली तातडीने थांबवावी. दस्तुरी नाका येथे येणाऱ्या पर्यटकांना अश्वचालक, कुली आणि एजंट गराडा घातला जातो. पर्यटकांना खोटी माहिती देऊन त्यांना दिशाभूल केली जाते. चुकीची माहिती देऊन फसवणूक करणे, अवाजवी दर आकारणे असे प्रकार घडतात. पार्किंगमध्ये अधिकृत शुल्काव्यतिरीक्त अतिरिक्त शुल्क आकारले जाते. भाडे नाकारणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांची हवा काढणे, त्यांच्या गाड्यांवर रेघोट्या ओढणे सारखे प्रकारही घडतात. या सर्व प्रकारांमुळे माथेरानची बदनामी होत आहे.

माथेरानच्या पर्यटनावर त्याचे विपरित परिणाम होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांनी यात हस्तक्षेप करून अशा अनुचित प्रकारांना प्रतिबंध करावा, अशी मागणी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने केली आहे.

दस्तुरी फाटा येथे पोलीस बंदोबस्तात वाढ करावी, तिथे पर्यटन सुविधा केंद्र सुरू करावे, पार्किंग झोनमध्ये घोडेवाले, एजंट कुली यांना प्रवेश बंदी करण्यात यावी, सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्यात यावेत. माथेरानच्या घाटाच्या पायथ्याशी असलेली बेकायदेशीर वसुली थांबविण्यात यावी. अश्वचालक, कुली, रिक्षाचालक यांचे दरपत्रक दर्शनी भागात लावण्यात यावे, बेकायदेशीर पथविक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी समितीने माथेरानच्या अधीक्षकांकडे केली आहे. यावर तातडीने पाऊले उचलली गेली नाही तर १८ मार्चपासून माथेरान बंद करण्याचा इशाराही दिला आहे.

माथेरानला येणाऱ्या पर्यटकांकडून अश्वचालक आणि टॅक्सीचालक यांच्याकडून मनमानी पद्धतीने पैशाची आकारणी करत आहेत. अवाजवी भाडे नाकारणाऱ्या पर्यटकांना त्रास दिला जात आहे. फसवणुकीच्या अशा प्रकारांमुळे माथेरानचे पर्यटन धोक्यात येत आहे. हे प्रकार तातडीने थांबले पाहिजेत.

-मनोज खेडकर, माथेरान पर्यटन बचाव समिती समन्वयक

अयोध्येत २९ लाख दिव्यांची विक्रमी आरास! ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

उपोषणकर्त्या शेतकऱ्याला घरी बोलावून पाजला ज्यूस; "किती ही सत्तेची मस्ती"...रोहित पवारांचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल

Mumbai : घर बदलणं महागात पडलं! 'मूव्हर्स अँड पॅकर्स'च्या कर्मचाऱ्यांनी ६.८ लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास; गुन्हा दाखल

Mumbai : १५ वर्षांनंतर MMRDA चा निर्णय; वडाळा ट्रक टर्मिनल प्लॉटचा १,६२९ कोटींना लिलाव होणार

'मविआ'चा एल्गार; EC विरोधात १ नोव्हेंबरला विराट मोर्चा; एक कोटी घुसखोर मतदार कमी करा! केंद्रीय गृहमंत्र्यांना विरोधकांचे आवाहन