मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर; नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणे भोवले 
महाराष्ट्र

मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर; नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणे भोवले

देशभर गाजत असलेल्या नाशिक 'टीसीएस' कंपनी धर्मांतर प्रकरणी शहरात बुधवारी मोठी कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील मास्टर माईंड निदा खान हिला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याचे नारेगावातील अनधिकृत घर महापालिकेने जमीनदोस्त केले.

Swapnil S

सुजित ताजणे / छत्रपती संभाजीनगर :

देशभर गाजत असलेल्या नाशिक 'टीसीएस' कंपनी धर्मांतर प्रकरणी शहरात बुधवारी मोठी कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील मास्टर माईंड निदा खान हिला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याचे नारेगावातील अनधिकृत घर महापालिकेने जमीनदोस्त केले. मनपा अतिक्रमण विभागाचा मोठा फौजफाटा सकाळी ६ वाजताच नारेगावात दाखल झाला. निदा खान लपली होती ते घर जेसीबीने जमीनदोस्त करण्यात आले.

दरम्यान, मतीन पटेलच्या नातलगांनी मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्यासह येथे आलेल्या पथकाचे हार-फुले देत स्वागत केले.

टीसीएस नाशिकमधील कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला ७ मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. मतीन पटेलने तिला आपल्या घरात आश्रय दिला होता. त्यानंतर ९ मे रोजी महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाबाबत त्याला नोटीस बजावली होती आणि ७२ तासांत उत्तर मागितले होते. अखेर मतिन पटेलच्या त्या घरावर देखील बुलडोजर फिरविण्यात आला.

आणखी अलिशान घर बांधू : जलील संतापले

एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी तेथील नागरिकांशी संवाद साधला आणि महानगरपालिकेच्या कारवाईत अडथळा आणू नका असे आवाहन केले. ते म्हणाले, तुमच्या प्रेमामुळे मोठी ताकद निर्माण झाली आहे. भाजपाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या बेकायदेशीर बांधकामांचे इतके पुरावे आहेत की त्यामध्ये महानगर पालिकांच्या अतिक्रमण विभागाने लिहून दिलेय की हे अनधिकृत आहे, ते तोडले पाहिजे, नगरसेवकांवर कारवाई केली पाहिजे. पण त्यावर कोणतीही कारवाई होत नाही असेही जलील म्हणाले. इथे येण्याआधी मी वकिलांशी बोललो आहे. जर मतीनचे घर कोसळले असेल तर मी तुम्हाला शब्द देऊन जातो की पूर्ण हिंदूस्तान पाहील की ज्या पद्धतीने हे घर पाडले गेले, त्यापेक्षा आलिशान घर आम्ही बांधू, हे आम्ही करून दाखवू, असेही आव्हान त्यांनी दिले.

निदा रात्री लावायची मेणबत्ती...

निदा खान ज्या घरात लपून बसली होती. त्या घराचा दरवाजा पथकाने उघडला तेव्हा घरात मेणबत्त्या पडलेल्या होत्या. निदा खान या घरात लपलेली असताना घरातील विजेचा वापर केला जात नव्हता. कुणालाच कळून येऊ नये, यासाठी निदा खान घरातील कोणतीही लाईट चालू करत नव्हती. निदा घरात मेणबत्ती लावून राहत होती.

राष्ट्रीय महिला आयोगाचा ठपका...

या प्रकरणात निदा खानचा महत्वाचा सहभाग होता, असा ठपका राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने ५० पानी अहवाल सादर केला आहे. यामध्ये निदा खानने इतर आरोपींसह महिलांचा छळ केला. जाळ्यात अडकलेल्या मुलींना निदा खान धार्मिक शिकवण द्यायची, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कंपनीच्या पॉश समितीनेही नाशिक युनिटला भेट दिली नसल्याचे उघड झाले आहे.

एमआयएम नगरसेवकावर कारवाईची मागणी

किशोर शितोळे यांनी नाशिक येथील कथित धर्मांतर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मतीन पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्याची मागणी भाजपच्या किशोर शितोळे यांनी केली असून पोलिस आयुक्तांना याबाबतचे निवेदनही दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक येथील धर्मांतर प्रकरणातील प्रमुख आरोपी निदा खान फरार असताना ती छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव परिसरात एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या फ्लॅटवर पोलिसांना आढळून आली. त्यामुळे आरोपीला आश्रय दिल्याचा संशय अधिक बळावला असून, याप्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सोन्या-चांदीवरील आयात शुल्क दुप्पट; रुपया सावरण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

एकच मंत्र-काटकसर! मोदींच्या ताफ्यात आता फक्त दोन मोटारी, राज्यातील मंत्र्यांचे ताफे निम्म्यावर

अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय

नीट पेपरफुटीः पुण्यातून महिलेसह पाच ताब्यात; कोचिंग क्लासेस, डॉक्टर्स यांचाही सहभाग?

CBSE बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्के घट, मुलींची बाजी