महायुती सरकारने राज्यात सुरु केलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही महिलांमध्ये अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय ठरली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना मासिक १५०० रुपयांचा सन्माननिधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जात आहे. आतापर्यंत २.२५ कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. मात्र, आता योजनेतील काही गैरप्रकार उघडकीस आले आहेत.
महिला व बालविकास विभागाच्या तपासणीत उघड झाले आहे की, १४,२९८ पुरुषांनीही महिलांच्या नावावर असलेल्या या योजनेचा लाभ घेतला आहे. याशिवाय, २६.३४ लाख महिलाही अपात्र असूनही लाभार्थी असल्याचे निदर्शनास आले आहे.
माहिती व तंत्रज्ञान विभागाची तपासणी
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, “शासनाच्या विविध विभागांकडून लाभार्थ्यांची माहिती मागवण्यात आली होती. तपासणी दरम्यान आढळले की अनेकांनी चुकीची माहिती देत अर्ज सादर केले. काहींनी एकापेक्षा अधिक योजना घेतल्या, काही कुटुंबांत दोनपेक्षा अधिक सदस्य लाभार्थी आहेत आणि काही अर्ज थेट पुरुषांनी केले आहेत.”
२६.३४ लाख अपात्र लाभार्थ्यांचा लाभ स्थगित
या पार्श्वभूमीवर, जून २०२५ पासून २६.३४ लाख अपात्र लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. यापुढे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शहानिशा करून पात्र लाभार्थ्यांनाच पुन्हा योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
तसेच, २.२५ कोटी पात्र महिलांना जून २०२५ चा सन्माननिधी वितरित करण्यात आलेला आहे. अपात्र ठरलेल्या व्यक्तींना पुढील सूचनांपर्यंत योजनेचा लाभ मिळणार नाही, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
बनावट लाभार्थ्यांविरोधात कारवाई होणार
योजनेचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार असून, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उच्चस्तरीय बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.
विरोधकांचा सरकारवर निशाणा
या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर तीव्र टीका केली असून, योजनेच्या अंमलबजावणीत गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरकारने मात्र, चुकीच्या लाभार्थ्यांना लाभ रोखून आणि कारवाई करून पारदर्शकता राखण्याचे आश्वासन दिले आहे.