MBBS प्रवेश सुरू; १२ ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज, पहिली गुणवत्ता यादी २३ ऑगस्टला 
महाराष्ट्र

MBBS प्रवेश सुरू; १२ ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज, पहिली गुणवत्ता यादी २३ ऑगस्टला

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस सुरुवात झाली.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस सुरुवात झाली. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख १२ ऑगस्ट आहे, तर पहिली गुणवत्ता यादी २३ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. ‘नीट’ परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेशासाठी नोंदणी करावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

एमबीबीएस व बीडीएसच्या अभ्यासक्रमासाठी २०२६ मध्ये जे विद्यार्थी नीट प्रवेश परीक्षेमध्ये पात्र झाले आहेत. ते विद्यार्थी केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करण्यास पात्र आहेत. विद्यार्थ्यांनी पोर्टलवर सर्व मूळ आवश्यक कागदपत्रांची रंगीत स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी. तसेच कागदपत्र पडताळणीसाठी विद्यार्थ्यांनी सर्व मूळ कागदपत्रासह पडताळणी केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांनी वैद्यकीय मंडळाने जारी केलेले दिव्यांग पात्रता प्रमाणपत्र सादर करावे. तसेच ईडब्ल्यूएसचा दावा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी वैध असलेले इडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आरक्षण प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र जे आवश्यक आहे ते सादर करणे आवश्यक आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी यंदा नवीन बदल

अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी पोर्टलवर सर्व मूळ आवश्यक कागदपत्रांची रंगीत स्कॅन केलेली प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणीच्या अंतिम तारखेच्या आधी सर्व कागदपत्रे काढून ठेवणे आवश्यक आहे.

संस्थात्मक फेरीच्या जागा सीईटी कक्ष ऑनलाइन भरणार

कॅपमध्ये शिल्लक राहिलेल्या जागा व संस्थांच्या असलेल्या जागा पूर्वी या संस्था स्तरावर भरण्यात येत होत्या. यावर्षी या सर्व जागा सीईटी कक्ष ऑनलाइन पद्धतीने भरणार आहे. त्यामुळे संस्थाचालकांच्या मनमानीपणाला लगाम लागणार आहे.

एनआरआय विद्यार्थ्यांसाठी १५ टक्के कोटा

ओबीसी व एसईबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी झाल्यापासून सहा महिन्यांपर्यंत वाढवली आहे. तसेच एनआरआय विद्यार्थ्याने त्याच्या पात्रतेच्या पडताळणीसाठी ११ ऑगस्टपूर्वी विदेशी उमेदवार नोंदणी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. एनआरआय विद्यार्थी गुणवत्तेनुसार केवळ १५ टक्के संस्थात्मक कोट्यासाठी पात्र आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबईतील मोकळ्या जागा भाजपकडून हडपण्याचा प्रयत्न; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

डेटा सेंटर क्षमतेत मुंबई १५व्या स्थानी; ‘नाइट फ्रँक ग्लोबल डेटा सेंटर’ अहवालात आर्थिक राजधानीचा गौरव

मतदार अर्ज १७ ऑगस्टपर्यंत भरा! मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

MHADA मुंबई मंडळाची लॉटरी नवीन वर्षात; अनामत रक्कम राहणार अर्जदाराच्या खात्यामध्ये, नवीन लॉटरीपासून निर्णय लागू

Mumbai : आंबेडकर भवन पाडकाम तपास SIT कडे वर्ग करा; हायकोर्टाचा राज्य सरकारला सल्ला