मुंबई : म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या १ हजार १३३ सदनिका व उपलब्ध ३६१ भूखंडांच्या विक्रीकरिता १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता लॉटरी काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते संगणकीय लॉटरी काढण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे २८ फेब्रुवारी रोजी १ हजार १३३ सदनिका व ३६१ भूखंडांच्या विक्रीकरिता लॉटरी जाहीर करण्यात आली. अर्ज भरण्यास मंडळाने मुदतवाढ दिली होती. त्यानुसार या लॉटरीसाठी ४ हजार ७५४ अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह ३ हजार ९८९ अर्ज प्राप्त झाले आहेत. या लॉटरीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ४२५ सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजना व २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ७०८ सदनिका तसेच ३६१ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या लॉटरीतील सदनिका अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी आहेत.