मुंबई : म्हाडा पुणे मंडळाच्या लॉटरीत यशस्वी अर्जदाराला घराच्या हक्कापासून डावलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. म्हाडा पुणे मंडळाचा अधिकारी आणि विकासकांनी परस्पर संगनमताने लॉटरी विजेत्याचे घर लाटल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी म्हाडा पुणे मंडळाचे मिळकत व्यवस्थापक विजयसिंह ठाकूर आणि बिल्डरविरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हाडा पुणे मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये अनिल पौलकर विजयी ठरले. त्यानुसार त्यांनी मंडळाकडे प्रशासकीय शुल्क भरले. त्याप्रमाणे मंडळाने पौलकर यांना घराची ३८,९९,७०० रक्कम विकासकाकडे भरण्यासाठी देकारपत्र देण्यात आले. सदनिकेमध्ये सीट आऊटचे नियोजन केल्याने घराची किंमत वाढत असल्याने याची चौकशी करून योग्य किंमत ठरवून सुधारित देकारपत्र देण्यात यावे, अशी मागणी पौलकर यांनी मंडळाकडे केली.
याचा गैरफायदा घेत म्हाडा पुणे मंडळाचे मिळकत व्यवस्थापक विजयसिंह ठाकूर यांनी अधिकार नसताना लॉटरी अर्ज न केलेले रवींद्र क्षीरसागर यांना सदर सदनिकेचे शुल्क भरण्याचे देकारपत्र दिले. सदनिकेचे शुल्क भरल्यानंतर मे. व्हिजन क्रिएटर्स या विकासकाने क्षीरसागर यांच्यासोबत अनधिकृत करारनामा केला होता.
या प्रकरणी पौलकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार म्हाडाचे दक्षता व सुरक्षा अधिकारी महेश चव्हाण यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार म्हाडा पुणे मंडळाचे मिळकत व्यवस्थापक विजयसिंह ठाकूर यांच्यासह प्रकरणातील संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.