महाराष्ट्र

आमदार अपात्रता सुनावणी! 'त्या' आमदारांची पक्षांतराची मानसिकता होती - सुनील प्रभू

सुनावणीच्या चौथ्या दिवशी देखील शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी घेण्यात आली

प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू आहे. सुनावणीच्या चौथ्या दिवशी देखील शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी घेण्यात आली. त्यावेळी काही आमदार मुंबईहून सुरतला गेले. ते मिसिंग असल्याचे वृत्तपत्रातून वाचले. आमच्या मागे राष्ट्रीय शक्ती असल्याचे वक्तव्य करीत योग्य निर्णय घेऊ असे सांगत होते, याचाच अर्थ पक्षांतर करण्याची त्यांची मानसिकता होती, असे सुनील प्रभू यांनी उलटतपासणीत सांगितले. त्याचवेळेस मुख्य प्रतोद पदावरून काढण्याचा अधिकार आमदारांना नाही, असेही प्रभू म्हणाले.

विधानसभाध्यक्षांसमोरील सुनावणीत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांची उलटतपासणी घेतली. त्यावेळी त्यांनी २१ जून रोजी केलेला ठराव, सुरतला गेलेल्या आमदारांचे पक्षांतर, आमदारांच्या सह्या अशा विविध मुद्यांवर सुनील प्रभूंची उलटतपासणी केली.

नोटीस व पक्षांतराच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुनील प्रभू म्हणाले की, महाशक्तीला जाऊन मिळण्यासाठी सुरतला गेलेल्या काही आमदारांचे पक्षांतर होऊ शकते, असे मीडियातील बातम्यांमधून समजत होते. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर होऊ शकते. त्यामुळे पक्षाच्या बैठकीला हजर राहण्यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना नोटीस बजावण्यात आली होती.

सरकार अस्थिर होत आहे हे कोणत्या आधारावर दिसले आणि खातरजमा न करता मीडियाच्या बातम्यांवर आपण नोटीस पाठवली का, असा प्रश्न जेठमलानी यांनी केला. त्यावर सुरतमधील एका हॉटेलमध्ये बसून आमच्या मागे राष्ट्रीय शक्ती असल्याचे वक्तव्य करीत होते आणि केवळ मीडिया रिपोर्ट वाचून नव्हे तर वास्तवातही आमदारांची मानसिकता दिसत होती, म्हणून नोटीस पाठवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्य प्रतोद म्हणून ३१ आमदारांनी तुम्हाला पदावरून काढून टाकले. त्यामुळे तुमचा व्हीप लागू होऊ शकत नाही, असा युक्तिवाद महेश जेठमलांनी यांनी केला. त्यावर मुख्य प्रतोद पदावरून मला हटवण्याचा अधिकार आमदारांना नाही माझी नियुक्ती पक्षप्रमुखांनी केली आहे. पदावरून काढण्याचेही अधिकार पक्षप्रमुखांचे आहेत. या पदापासून मला काढण्याचे अधिकार आमदारांनाही नाहीत, असे ठामपणे सांगितले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी