राज ठाकरे  संग्रहीत छायाचित्र
महाराष्ट्र

स्मशानभूमीतील लाकडांसाठी सर्वाधिक जंगलतोड, सरकारनं विद्युतदाहिनींची संख्या वाढवावी; राज ठाकरेंची मागणी

राज्यसरकारनं स्मशानभूमी विद्युतदाहिनींची संख्या वाढवावी, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. स्मशानभूमीतील लाकडांसाठी सर्वाधिक जंगलतोड होते, असं राज ठाकरे म्हणाले.

Suraj Sakunde

राज्यसरकारनं स्मशानभूमी विद्युतदाहिनींची संख्या वाढवावी, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. स्मशानभूमीतील लाकडांसाठी सर्वाधिक जंगलतोड होते, असं राज ठाकरे म्हणाले. आपल्याला काही गोष्टी बदलाव्या लागतील, त्यात सुधारणा कराव्या लागतील, अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली आहे.

विद्युतदाहिनींचं देशभराचं प्रमाण ०.१ टक्केही नाही...

राज ठाकरे म्हणाले की, "मुळात पहिल्यांदा आपल्या धर्माकडे पाहणं गरजेचं आहे. या देशामध्ये आपल्या धर्मामध्ये जेव्हा हजार लोक दररोज मरण पावतात, त्यांचे अंतिम संस्कार हे लाकडावर होतात. ही लाकडं कुठून येतात. आज ही जी जंगलतोड होतीये. त्या जंगलतोडीचा सर्वाधिक लाकडाचा पुरवठा कुठं होत असेल, तर तो स्मशानभूमीमध्ये होतो. इलेक्ट्रिक विद्युतदाहिनींचं देशभराचं प्रमाण ०.१ टक्केही नाही. आपल्या धर्मातील अनेक परंपरा जगवण्यासाठी आपण इतक्या मोठ्या प्रमाणात जंगलतोड करत आहोत. यामध्ये बदल करणं गरजेचं आहे."

राज ठाकरेंच्या या भुमिकेचं अनेकांनी स्वागत केलं आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार, अभिनेते सयाजी शिंदे, नाशिकमधील काळाराम मंदिराचे महंत सुधीर दास यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे.

सूचना चांगली आहे-सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "सूचना चांगली आहे. पण आपल्याकडे काही ठिकाणी बघितलं, तर अजूनही लोकांच्या विश्वासाला बदलवण्याची आवश्यकता आहे. आपल्याला काळानुरूप विद्युतदाहिनी, गॅसदाहिनीकडे जावंच लागेल किंवा शेणापासून बनवलेल्या गौऱ्यापासून मशिनच्या साहाय्याने जे रॉड बनवले जातात, त्यांचाही उपयोग केला जाऊ शकतो."

निसर्गासाठी तसेच पर्यावरणासाठी फारच चांगलं...

अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की, "राज ठाकरेंची विधानं नेहमीच प्रेरणादायी आणि रोखठोक असतात. हे वक्तव्य तर निसर्गासाठी तसेच पर्यावरणासाठी फारच सरळ आणि चांगलं आहे. मला वाटतं ते स्ट्रॅटर्जीक लेव्हलवर सरकारनं अंमलात आणलं पाहिजे. गोरेगावच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये दर महिन्याला ३०० प्रेतं येतात. एका प्रेताला ७ मन जळण लागतं. किती लाकडं लागत असतील."

धर्मशास्त्रीय दृष्टीकोनामध्ये अयोग्य नाही...

नाशिकमधील काळाराम मंदिराचे महंत सुधीर दास म्हणाले की, "धर्मशास्त्रीय दृष्टीकोनामध्ये त्याला काही अयोग्यता नाही. काही विधी आहेत, पुजेसाठी लागणारे तिथे काही पाच सहा लाकडं आहेत, जसं की चंदनाचं लाकूड असेल किंवा पिंडदानासाठी लागणारी थोडी लाकडं ठेवावी आणि विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात यावा. धर्मशास्त्रीयदृष्ट्या त्याला कुठला अडथळा नाही. राजसाहेबांची सूचना चांगली आहे."

विद्युतदाहिनी पर्यावरणासाठी अजिबातच चांगली नाही....

इको फ्रेंडली लाईफ फाऊंडेशनचे विजय लिमये म्हणाले की, "विद्युतदाहिनी पर्यावरणासाठी अजिबातच चांगली नाही, कारण त्यासाठी वीज लागते. ही वीज आपल्याला आजही कोळसा जाळून निर्माण करावी लागते. याला सुंदर पर्याय म्हणजे मोक्ष काष्ठ. पालापाचोळा शेतकरी आजपर्यंत जाळत होते. आता तो आम्ही विकत घेतो आणि त्यापासून हे बनवलेलं आहे. ते ४०० रूपयांनी स्वस्त आहे. त्यामुळं परवडणारंदेखील आहे, सोबतच हे पर्यावरणपूरकही आहे."

आरोप-प्रत्यारोपात महाराष्ट्राचा विकास भरकटतोय

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी