पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर तालुक्यातील लोहारे हद्दीत रस्त्याबाहेर उभ्या असलेल्या आयशर ट्रकला भरधाव कारने मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका कुटुंबातील माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला, तर बाप-लेक गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शनिवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आयशर ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून चालक नदीकाठी गेला असताना मागून येणाऱ्या कारने नियंत्रण गमावून ट्रकच्या मागील भागाला जोरदार धडक दिली. या अपघातात दापोली येथील अनिल रावसाहेब मरकड (४४) आणि त्यांचा मुलगा चिन्मय मरकड (५) गंभीर जखमी झाले.
अनिल मरकड यांना पुढील उपचारांसाठी मुंबई येथे, तर चिन्मय याला महाड येथे हलविण्यात आले आहे. अपघातात अनिल मरकड यांच्या पत्नी सुवर्णा मरकड (४५) आणि मुलगी अनुश्री मरकड (१६) यांचा जागीच मृत्यू झाला. हे कुटुंब अहमदनगर (अहिल्यानगर) येथून दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे जात होते. अनिल मरकड हे विद्यापीठात कर्मचारी असून सुवर्णा मरकड या दापोली येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत होत्या.
घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, उपनिरीक्षक सतीश पवार, पोलीस कर्मचारी तसेच नरवीर आणि काळभैरवनाथ रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारांसाठी रवाना करण्यात आले.
दरम्यान, महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी अपघातस्थळ तसेच ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.