महाराष्ट्र

"मिस्टर राज, तुमच्यात अन् माझ्यात एक फरक...", सुषमा अंधारेंचे राज ठाकरेंना उत्तर

"बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवर प्रेम आहे म्हणून सांगता", असा सवाल राज ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

Aprna Gotpagar

मुंबई : 'सत्ताधाऱ्यांच्या मनात माझी किती धास्ती आहे, याची पोचपावती आज तुम्ही दिली. माझा हा धाक आणि दरारा सुपारीबाज लोकांवर कायम गारुड करून राहायला हवा', असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी रविवारी, १२ मे रोजी ठाण्यात महायुतीचे ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारसाठी सभा घेतली होती. यावेळी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत विरोधकांवर निशाणा साधला. त्यांनी सुषमा अंधारे यांचा जुना व्हिडिओ लावला. या व्हिडिओमध्ये सुषमा अंधारे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यानंतर सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

"तुम्ही म्हणता ना माझे वडील चोरले, ज्या वडिलांबद्दल ऐवढे प्रेम आहे. मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आलो. पण, आता सांगतोय, लाव रे तो व्हिडिओ" असे म्हणत राज ठाकरेंनी सुषमा अंधारेंचा जुन्हा व्हिडिओ दाखविला. या व्हिडिओत सुषमा अंधारे म्हणाल्या, "वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात, ८०-८५ वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे. हात थरथर कापायला लागलेत आणि त्या हातात तलवार आहे. तरुण मुले काय गोट्या खेळायला गेलेत का? गल्लीत गिल्ली दंडा खेळायला गेलीत काय? यावर आग्रलेख कधीच होत नाही, अशी टीप्पणी करणारा सुषमा अंधारेंचा जुना व्हिडिओ ठाण्याच्या प्रचार सभेत दाखविला.

राज ठाकरे पुढे म्हणाले, यांच्या अनेक क्लिप आहेत. मला त्यांच्या क्लिपचे काही देणे घेणे नाही. परंतु, ज्या बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई ८०-८५ वर्षांच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यानंतर थरथर करतात, असे बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रवक्त्या करता, तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवर प्रेम आहे म्हणून सांगता", असा सवाल राज ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

सुषमा अधारेंची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी -

मिस्टर राज,

तुमच्यात अन् माझ्यात एक फरक आहे. मी सामाजिक न्यायासाठी लढत आहे. तुम्ही माञ कायम प्रोएस्टॅब्लिश भूमिका घेत आलात..

शिंदे-फडणवीस-अजित पवार या सगळ्यांनी मिळून दिलेल्या सुपारी मध्ये तुम्हाला पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणे हा माझा विजय आहे.

माझ्यात आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये एक साम्य नक्की आहे, बाळासाहेब म्हणतात, माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी एकदा सुटली सुटली शोधत बसत नाही इथे पडली का तिथे पडली?

27 वर्षापूर्वीचा वादविवाद स्पर्धेतील एक चंक काढून ज्यात माझा चेहराही ओळखायला येत नाही तो दाखवून फार मोठे तीर मारले असं जर वाटत असेल तर रमेश किनी हत्याकांड, कोहिनूर मिल, ईडीच्या नोटिसा, देवेंद्र फडणवीस यांनी मनसे ऊनसे म्हणत केलेली अवहेलना, अजित पवारांनी तुम्हाला गवत उपटण्यापर्यंतची केलेली सुसंस्कृत भाषा हे सगळं दाखवायला मला कितीसा वेळ लागेल ? ...पण असो माझ्या माऱ्या पुढे सत्ताधारी किती हतबल झालेत

ना?

सत्ताधाऱ्यांच्या मनात माझी किती धास्ती आहे याची पोचपावती आज तुम्ही दिली. माझा हा धाक आणि दरारा सुपारीबाज लोकांवर कायम गारुड करून राहायला हवा...!

धन्यवाद..!

दरम्यान, ट्विटरवर दुसरी एक पोस्ट करत, "मिस्टर राज...सविस्तर उत्तर मी उद्या संध्याकाळी देईन..., असेही अंधारेंनी लिहिले आहे.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप