'एसटी'च्या सुट्या भागांच्या खरेदीचे रखडले करार; कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप, चौकशीची मागणी संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

'एसटी'च्या सुट्या भागांच्या खरेदीचे रखडले करार; कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप, चौकशीची मागणी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसच्या दैनंदिन देखभाल व दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या सुट्या भागांच्या खरेदीसाठीचे नियमित दर करार रखडले आहेत.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसच्या दैनंदिन देखभाल व दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या सुट्या भागांच्या खरेदीसाठीचे नियमित दर करार रखडले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील खरेदीत मोठी वाढ झाली आहे. त्यातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे.

निविदा प्रक्रियेद्वारे स्पर्धात्मक दर निश्चित करून होणारी केंद्रीकृत खरेदी रखडल्यामुळे विभागीय कार्यशाळा, आगार आणि मध्यवर्ती कार्यशाळा स्तरावर मोठ्या प्रमाणात स्थानिक खरेदी करण्यात आली. या खरेदीपैकी काही व्यवहारांमध्ये मात्र साहित्य चढ्या दराने खरेदी करण्यात आल्याचा आरोप संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

गेल्या सहा महिन्यांत सुट्या भागांच्या खरेदीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या सर्व व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी बरगे यांनी केली आहे.

महामंडळाच्या मालकीच्या १४ हजार ४३२ बसेसपैकी सुमारे १३ हजार बसेस दररोज रस्त्यावर धावत असल्याने त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी विविध प्रकारचे सुटे भाग आणि साहित्य हे सातत्याने आवश्यक असते. या साहित्याच्या खरेदीसाठी महामंडळाकडून निविदा प्रक्रिया राबवून साधारणपणे वर्षभरासाठी दर करार निश्चित केले जातात. त्यानुसार संबंधित पुरवठादारांकडून निश्चित दराने साहित्याचा पुरवठा केला जातो. या प्रक्रियेमुळे खरेदीत एकसमानता, स्पर्धात्मक दर आणि आर्थिक शिस्त राखली जाते.

मात्र, व्यवस्थापनाने गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून नवीन दर करार केले नसून सहा महिन्यांपूर्वी १४ पुरवठादारांनी सुमारे ५५ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या दर कराराच्या निविदा भरूनही वाणिज्य निविदा उघडल्यानंतर नियमानुसार त्यावर सहा महिन्यांच्या आत निर्णय न झाल्याने वैधता कालावधी संपला व दर करार झालेच नाहीत.

३०% जादा दराने खरेदी

दर करार न झाल्याने दैनिक देखभालीमध्ये सामाना अभावी गाड्या मार्गावर न जाता थांबतील व प्रवाशांची गैरसोय होईल अशी वरिष्ठ व्यवस्थापनाला भीती दाखवत स्थानिक पातळीवर सामान खरेदी करण्याची नामी संधी काही विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली. त्यामुळे स्थानिक खरेदीत मोठी वाढ झाली. दर करारापेक्षा ३० टक्के जादा दराने खरेदी करण्यात आली असून वाढलेल्या खर्चाची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पावसाने चकवले; एल निनोचे अंदाज फसले, मुंबईत दोन महिन्यांत ८३ टक्के पाऊस

भोंदूबाबा अशोक खरातला ७ ऑगस्टपर्यंत कोठडी

'नीट पीजी' परीक्षा नियमांत मोठा बदल

Mumbai : बनावट SIR लिंक पाठवून गंडा; निवृत्त डॉक्टरची ६.७१ लाखांची फसवणूक

भिवंडीत खड्ड्याने घेतला महिलेचा बळी