मुंबई : राज्य पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा त्यांच्या साहसी कामगिरीबद्दल 'मुख्यमंत्री शौर्य पदक' देऊन गौरव करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत खाकी वर्दीच्या धाडसाला सलाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कर्तव्य बजावताना जोखीम पत्करून केलेल्या कामगिरीसाठी मुख्यमंत्री शौर्य पदक विजेत्यांना रोख ५० हजार रुपये, पदक तसेच प्रशस्तीपत्र मिळणार आहे.
दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री शौर्य पदकांची घोषणा करण्यात येईल. दरवर्षी शौर्य पदकांची निश्चित अशी संख्या राहणार नाही, तर राज्यभरातील क्षेत्रीय स्तरावरील कामगिरींबाबतचे अहवाल आणि येणाऱ्या प्रस्तावांच्या अधीन राहून पदके जाहीर केली जातील. मुख्यमंत्री शौर्य पदक मरणोत्तरही देण्याची तरतूद करण्यात आली.
देशातील इतर राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री शौर्य पदक दिले जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री शौर्य पदकासाठी निवड पद्धती, त्यासाठी समितीची रचना आणि अनुषांगिक खर्चाच्या तरतुदीस मंजुरी दिली.
या पुरस्कार निवडीसाठी राज्य पोलीस महासंचालाकांच्या अध्यक्षतेखाली प्रथम निवड समिती असेल. या समितीकडे जिल्हास्तरावरून पोलीस अधीक्षक हे त्या परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याद्वारे, तर पोलीस आयुक्त पोलीस महासंचालकांकडे प्रस्ताव सादर करतील. गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल. शौर्य पदकाचे प्रस्ताव गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केले जातील.