महाराष्ट्र

मंत्रालयात पुन्हा जाळीवर उड्या; आदिवासी कोट्यातून आरक्षणाच्या मागण्यांसाठी धनगर समाज आक्रमक

Swapnil S

मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावर आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी धनगर समाजाच्या आंदोलकांनी मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण द्या, अशी मागणी करीत धनगर समाजाच्या आंदोलकांनी संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. यामुळे पोलिसांची चांगलीच पळापळ झाली. अखेर समजूत काढत आंदोलकांना बाहेर काढून ताब्यात घेण्यात आले आणि नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी आदिवासी आमदारांनी ‘पेसा’ कायद्यांतर्गत भरती व्हावी यासाठी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत असलेल्या संरक्षण जाळीवर उड्या मारत आंदोलन केले होते. त्यावेळी विधानसभेचे उपसभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले होते. त्या आंदोलनाचा मुद्दा चर्चेत असताना अशाच प्रकारच्या आंदोलनाची पुनरावृत्ती मंगळवारी मंत्रालयात झाली.

धनगर समाजाला आदिवासी कोट्यातील आरक्षण मिळावे, अशी मागणी धनगर समाजाच्या आंदोलकांनी केली आहे. या मागणीसाठी आंदोलकांनी मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर उडी मारून आंदोलन केले. आंदोलक राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मागण्यांसाठी उपोषण करायला बसले होते. अखेर ते मंगळवारी मंत्रालयात आले आणि त्यांनी संरक्षण जाळीवर उड्या मारत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे एक महिला पोलीस अधिकारी संरक्षण जाळीवर उतरली. तिने आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आंदोलक बाहेर आले. आमचे निवेदन स्वीकारा, या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले होते. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आणि नंतर सुटका केली.

महायुतीने मंत्रालयाची सर्कस केली आहे - वडेट्टीवार

आदिवासी आरक्षणाच्या मुद्द्यानंतर आता धनगर आरक्षणासाठी कार्यकर्त्यांनी मंत्रालयातील जाळीवर उड्या मारल्या. महायुती सरकारने महाराष्ट्रातील विविध समाजात अस्वस्थता निर्माण केली असून, महाराष्ट्राच्या मंत्रालयाची सर्कस करून ठेवली आहे. एकामागून एक आंदोलन होत आहेत. पण सरकार अजूनही निष्क्रिय आहे. दोन समाजात निवडणुकीच्या तोंडावर असे वाद लावणे योग्य नाही, असे ‘ट्विट’ विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ‘एक्स’वर केले.

वडेट्टीवार यांनी घटनेचे काही व्हिडिओही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

Election Results 2024: हरयाणात भाजपची हॅटट्रिक; जम्मू-काश्मीरमध्ये एनसी-काँग्रेस सत्तेवर

अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

मुंबईत बांधकामाच्या ठिकाणी चुली, शेकोट्या बंद; हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी BMC ची कडक मार्गदर्शक तत्त्वे

गुजरातचे दोन ठग महाराष्ट्र लुटताहेत; उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदी, शहांवर सडकून टीका

Women's T20 WC: स्मृतीकडून अपेक्षा, हरमनप्रीतबाबत अद्याप संभ्रम; भारताची आज लंकेशी लढत, फलंदाजांच्या कामगिरीची चिंता