अरविंद गुरव/ पेण
गेली १७ वर्षे सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम कासवापेक्षा ही संथगतीने सुरू आहे. पेण ते वडखळ या मार्गाचे काम मे महिन्यापर्यंत बऱ्यापैकी झाले होते. मात्र पावसाळ्यात या रस्त्याची वाताहात झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. मुजोर ठेकेदार, बेफिकीर अधिकारी आणि ढिम्म राजकारणी नेतेमंडळींच्या दुर्लक्षामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे खड्ड्यांचे विघ्न संपलेले नसून या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
काही ठिकाणी अर्धवट काँक्रीटीकरण करून काम सोडून दिले आहे. साइडपट्ट्या अर्धवट अवस्थेत आहेत. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाताना या गणेशभक्तांना विविध प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. विशेष म्हणजे या महामार्गावरील खड्डे भरपावसात भरण्याची ठेकेदाराने लढवलेली शक्कल पूर्णपणे फेल गेली असून खड्ड्यात टाकलेली डांबर अणि खडी पावसाच्या पाण्यात विरघळली की काय? अशा प्रकारची चर्चा प्रवास करत असणारे प्रवासी करताना दिसत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाचा पळस्पे ते इंदापूर हा पहिला टप्पा २०११ साली सुरू झाला. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमानी व प्रवाशांना आनंद झाला होता. मात्र, महामार्गाच्या कामाला १७ वर्षे पूर्ण होत आली. तरी प्रवासी आजपर्यंत सुखकर प्रवासापासून वंचित राहिले आहेत. दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की बांधकाम मंत्री, संबंधित नेते, स्थानिक आमदार आदी लोकप्रतिनिधी या महामार्गाची पाहणी करून गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे भरण्यात येणार असल्याची केविलवाणी घोषणा करत असतात. मुंबई-गोवा महामार्गाने रोज प्रवास करणाऱ्या चालकांना, प्रवाशांना पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी यासारखे आजार जडले आहेत. मात्र नेहमीची येती पावसाळा या उक्तीप्रमाणे दरवर्षी या महामार्गावरून गणेशभक्तांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत असल्याने या लोकप्रतिनिधींबाबत देखील प्रवासी आणि वाहनचालक नाराजी व्यक्त करत आहेत.
मुंबई-गोवा महामार्ग बनविण्यासाठी वापल्या जाणाऱ्या काँक्रीट, रेती, खडी आणि इतर सामनाचा दर्जा तपासनारी यंत्रणा महामार्ग प्राधिकरणाकडे आहे का? महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांच्या काम करण्याच्या प्रणालीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा ठेका हा डांबरापासून बनविण्याचा काढण्यात आला होता. डांबर आणि कामाच्या सुमार दर्जामुळे या अर्धवट बनलेल्या महामार्गाला वारंवार खड्डे पडत असल्याने येथील राजकारणी आणि नेतेमंडळींना सिमेंट काँक्रीटच्या महामार्गात रस दाखवला. त्यामुळे या महामार्गाच्या कामाचा ठेका ३-४ पटीने वाढवून मागील दोन वर्षांपासून काँक्रीटीकरणाच्या कामाने वेग घेतला. मात्र झोपेचे सोंग घेतलेल्या महामार्ग प्राधिकरणाने या सिमेंट काँक्रीटची गुणवत्ता तपासण्यास वेळ मिळत नसल्याने या मार्गाची वाताहात झालेली आहे.
सुनील तटकरे यांचा पाहणी दौरा
दरवर्षी गणेशोत्सवाकरिता देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो चाकरमानी कोकणात येतात. कोकणात येणाऱ्या भाविकांकरिता मुंबई-गोवा मार्गावरील प्रवास सुकर होण्याच्या दृष्टीने रायगडचे खासदार सुनील तटकरे पाहणी करणार आहेत. यावेळी मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पाच्या सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
महामार्गासाठी लागणाऱ्या सिमेंट काँक्रीट आणि इतर साहित्याच्या दर्जाची तपासणी करण्यासाठी शासनाकडून लॉयन इंजिनिअरिंग या कंपनीला ठेका देण्यात आला आहे आणि या कंपनीकडून योग्य त्यावेळी कामाच्या दर्जाची तपासणी होत आहे. मागील गणेशोत्वाच्या वेळी तयार करण्यात आलेल्या महमार्गावरील काही टप्प्यांचे काम वाहतूककोंडी होऊ नये म्हणून करण्यात आले होते. मात्र महामार्गावर वापरलेले काँक्रीट सुकण्याचा कालावधी कमीतकमी १४ दिवसांचा आहे. परंतु रस्त्याचे काम केल्यानंतर अवघ्या काही तासांतच या काँक्रीट रस्त्यावरून वाहतूक सुरू केल्याने सदरील रस्त्यावरील सिमेंट आणि रेती उडून गेली. संबधित ठेकेदाराला १० वर्षांसाठी मेंटेनन्सचे काम देण्यात आले आहे. - यशवंत घोटकर, प्रकल्प अधिकारी, मुंबई-गोवा महामार्ग