मुंबई : चिपळूण येथील बहादुर शेख चौकातील उड्डाणपुलाचे काम नव्याने हाती घेण्यात आले आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचा खर्च संबंधित कंत्राटदार करणार असून याप्रकरणी कंत्राटदाराला ५० लाखांचा, तर मुख्य अभियंत्याला २० लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांनी विधानसभा नियम १०५ अन्वये मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर भोसले यांनी उत्तर दिले. राज्यभरात महामार्गाची काम सुरू असून त्यापैकी एक मुंबई-गोवा महामार्ग आहे. १२ वर्षांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ पनवेल-इंदापूर-झाराप- पात्रादेवी ही लांबी ४६० कि.मी. आहे. पैकी ० ते ८४. ६० (पनवेल ते इंदापूर) या लांबीतील काम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहे. त्यापुढील ८४ / ६०० ते ४५० / १७० लांबीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहे. मात्र चिपळूण येथील बहादूर शेख चौकातील पुलाच्या कामात गर्डर टाकताना १६ ऑक्टोबर २०२३ रोजी पुलाचा भाग कोसळला होता. याठिकाणी पुलाचे काम करू नये, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केली होती.
माळशेज घाटातील पुलाच्या कामाचे सर्वेक्षण
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी माळशेज घाटात पुलाचे काम न करता अन्य ठिकाणी करण्यास होकार दिला होता. माळशेज घाटातील जमीन भुसभुशीत आहे. मात्र राज्य सरकारने त्याच ठिकाणी पुलाचे काम हाती घेतले आणि दुर्घटना घडली होती. परंतु पुन्हा नव्याने त्याच ठिकाणी पुलाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे समजते. पुलाचे काम हाती घेण्याआधी तेथील सर्वेक्षण करण्यात यावा, अशी सूचना भास्कर जाधव यांनी विधानसभेत केली. भास्कर जाधव यांच्या सूचनेनुसार पुलाच्या कामाचे सर्वेक्षण लवकरच करण्यात येईल. धोका नसल्यास जानेवारी २०२६ पर्यंत पूल सेवेत येईल, अशी माहिती मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.