कोयनेच्या पाण्यावर मुंबईचा डोळा; कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या हक्काचे काय? पाणीहक्कांचा प्रश्न ऐरणीवर संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

कोयनेच्या पाण्यावर मुंबईचा डोळा; कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या हक्काचे काय? पाणीहक्कांचा प्रश्न ऐरणीवर

मुंबईची वाढती पाण्याची गरज भागविण्यासाठी कोयना प्रकल्पातील सुमारे ६७ टीएमसी पाणी मुंबईकडे वळविण्याचा प्रस्ताव चर्चेत आला आहे.

प्रतिनिधी

राजन चव्हाण

सिंधुदुर्ग : मुंबईची वाढती पाण्याची गरज भागविण्यासाठी कोयना प्रकल्पातील सुमारे ६७ टीएमसी पाणी मुंबईकडे वळविण्याचा प्रस्ताव चर्चेत आला आहे. यासाठी हजारो कोटींचा खर्च करून डोंगरांमधून बोगदे तयार करण्याचे नियोजन असल्याची चर्चा आहे. मात्र, या प्रस्तावामुळे पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग आणि कोकणातील गावांच्या पाणीहक्कांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कोयनेचे पाणी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला देण्याची मागणी १९९५ मध्ये तत्कालीन युती सरकारच्या काळातही झाली होती. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष सुभाष देसाई यांनी रत्नागिरी दौऱ्यात याबाबत घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात ही योजना पुढे सरकली नाही. आता अनेक वर्षांनंतर पुन्हा मुंबईसाठी पाणी वळविण्याची चर्चा सुरू झाली आहे.

या प्रस्तावातील सर्वाधिक गंभीर प्रश्न वाशिष्ठी नदीच्या भवितव्याचा आहे. कोयना प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर सोडले जाणारे पाणी वाशिष्ठी नदीत जाते. या नदीवर चिपळूण परिसरातील गावे, शेती, औद्योगिक वसाहती आणि स्थानिक अर्थव्यवस्था अवलंबून आहे. पाणी मुंबईकडे वळविल्यास नदीचा नैसर्गिक प्रवाह, शेती, मत्स्यव्यवसाय आणि पर्यावरणावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. कोकणात मुबलक पाऊस पडत असतानाही उन्हाळ्यात अनेक गावांना टँकरवर अवलंबून राहावे लागते. पावसाचे पाणी समुद्राला मिळते; मात्र स्थानिक सिंचन आणि पाणी साठवणुकीचे नियोजन अपुरे आहे.

आराखडा जाहीर करा

मुंबईला पाणी देण्यास विरोध नसला तरी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी किती पाणी राखीव ठेवणार, वशिष्ठी नदीचा नैसर्गिक प्रवाह कसा जपणार आणि कोकणातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याची हमी काय, याचा स्पष्ट आराखडा सरकारने जाहीर करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मुंबईची तहान भागविताना कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पाणीहक्कांवर अन्याय होऊ नये, हीच स्थानिकांची प्रमुख मागणी आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

प्रत्येक फ्लॅटसाठी प्रॉपर्टी कार्ड; राज्यातील सात कोटी फ्लॅटधारकांना मिळणार दिलासा, राज्य सरकारचा प्रस्ताव

हाय फॅट, साखर, मिठाची स्वतंत्र इशारा चिन्हे अनिवार्य; पाकीटबंद खाद्यपदार्थांबाबत सुप्रीम कार्टाचा आदेश

वॉशिंग सेंटर : पाणी वापरावर बंदी; पिण्याचे पाणी न वापरण्याबाबत राज्य सरकारचा प्रस्ताव, गृहनिर्माण सोसायट्यांवरही निर्बंधांची शक्यता

कॉफी डे एंटरप्रायझेसच्या व्यवहारांची चौकशी होणार; निधी वळवल्याप्रकरणी फॉरेन्सिक ऑडिटर नियुक्त

Navi Mumbai : तुर्भे रेल्वे उड्डाणपूल चार महिने वाहतुकीसाठी बंद; ३१ मार्चपर्यंत वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग