खंडाळ्याच्या घाटातून होणार झपाझप प्रवास; मिसिंग लिंकचे उद्घाटन ठरल्यानुसार १ मे रोजी X/ DNT_DFB
महाराष्ट्र

खंडाळ्याच्या घाटातून होणार झपाझप प्रवास; मिसिंग लिंकचे उद्घाटन ठरल्यानुसार १ मे रोजी

खंडाळा घाटातील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असताना एका खऱ्याखुऱ्या युद्धाने त्यात अडथळा निर्माण केला. इराण युद्धामुळे या रस्त्याच्या कामासाठी अत्यावश्यक असलेले डांबर मिळेनासे झाले. पण राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अथक प्रयत्नाने ते उपलब्ध झाले असून ठरल्यानुसार एक मे रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Swapnil S

मुंबई : खंडाळा घाटातील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असताना एका खऱ्याखुऱ्या युद्धाने त्यात अडथळा निर्माण केला. इराण युद्धामुळे या रस्त्याच्या कामासाठी अत्यावश्यक असलेले डांबर मिळेनासे झाले. पण राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अथक प्रयत्नाने ते उपलब्ध झाले असून ठरल्यानुसार एक मे रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खोपोली येथील बोगद्यात हा कार्यक्रम होणार असून त्याला एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील. त्यानंतर ही नवी मार्गिका प्रवाशांसाठी खुली होणार असून खंडाळा घाटातील प्रवासाचा वेळ सुमारे अर्ध्या तासाने कमी होणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात तीव्र चढण तसेच वळणावळणांमुळे वाहनांचा वेग कमी होतो. वाहतुकीची कोंडी होते. तसेच टँकर इत्यादी वाहनांचे अपघात होऊन रस्ता ठप्पा होतो. यावर मार्ग काढण्यासाठी कुसेगाव ते खोपोली या दरम्यान १३.३ किलोमीटर लांबीची एक स्वतंत्र मार्गिका उभारण्याचा प्रस्ताव २०१९ मध्ये संमत झाला. तीच ही मिसिंग लिंक नावाने ओळखली जाते.

ही मार्गिका २०२१ मध्येच खुली होणे अपेक्षित होते. पण तिला विविध कारणांनी उशीर झाला. अंतिम टप्प्यात आखातातील युध्दामुळे डांबराचा तुटवडा निर्माण झाल्याची अडचण आली. पण त्यावर मात करून अखेर हा रस्ता प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

द्रुतगती मार्गावरील एकूण रहदारीपैकी सुमारे सत्तर टक्के हिस्सा हा कार आणि बसचाच असतो. तर तीस टक्के अवजड वाहतूक या मार्गाने होते. मिसिंग लिंकमुळे वाहतुकीचा ताण कमी होणार असून वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल.

मिसिंग लिंक म्हणजे काय आहे

मिसिंग लिंक प्रकल्पामध्ये दोन मुख्य बोगद्यांचा समावेश आहे. त्यांची लांबी सुमारे नऊ किलोमीटर आणि दोन किलोमीटर इतकी आहे. यातील सुमारे नऊ किलोमीटर लांबीचा आणि २३.५ मीटर रुंदीचा बोगदा हा आशियातील सर्वात लांब बोगद्यांपैकी एक आहे. याखेरीज या मार्गिकेचा भाग म्हणून टायगर व्हॅलीमध्ये १८० मीटर पेक्षा अधिक उंचीवर ६५० मीटर लांबीचा 'केबल-स्टेड' पूल उभारण्यात आला असून ते प्रवाशांचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

टँकरची भीती नाही

मिसिंग लिंकवरून सुरुवातीला सहा महिने केवळ कार आणि बस यासारख्या वाहनांनाच परवानगी दिली आहे. अवजड वाहने आणि धोकादायक मालाची किंवा रसायनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जुन्या घाट सेक्शनचाच वापर करावा लागेल. त्यामुळे अपघातांची भीती कमी होणार आहे.

UPI शुल्कावर GST? पात्र व्यापाऱ्यांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करता येणार

Mumbai : स्नॅपचॅटवर मैत्री, व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग अन् ब्लॅकमेलिंग; तरुणीकडून ४० हजार उकळले, आरोपी पंजाबमधून अटकेत

सोने हॉलमार्किंग शुल्कात वाढ; सणासुदीच्या हंगामापूर्वी ₹४५ वरून २७५ पर्यंत भार

कृषी उत्पन्न बाजार समित्या रोजगारनिर्मितीचे केंद्र बनवणार; पणन मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन

Thane : शासकीय रुग्णवाहिकांची डिझेलसाठीची धावपळ थांबणार! 'ड्राईव्ह ट्रॅक प्लस' कार्डमुळे इंधनाची अडचण दूर होणार