मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला; रेल्वे मार्गावरील काम सुरू, नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन 
महाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला; रेल्वे मार्गावरील काम सुरू, नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन

वाहतूक पोलिसांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, गरज भासल्यास वाहने जुन्या मार्गावर वळविण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : मुसळधार पावसामुळे सोमवारी (दि. ६) सकाळी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाजवळ आणि मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. दिवसभर युद्धपातळीवर सुरू असलेल्या कामानंतर एक्स्प्रेसवे वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला असला, तरी रेल्वे मार्गावरील माती हटविण्याचे काम अद्याप सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

एक्सप्रेसवेवरील वाहतूक पुन्हा सुरू

दरड कोसळल्याने रस्त्यावर साचलेली माती आणि पाणी हटवल्यानंतर प्रशासनाने मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक पुन्हा सुरू केली. वाहतूक पोलिसांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, गरज भासल्यास वाहने जुन्या मार्गावर वळविण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.

रेल्वे मार्गावरील काम युद्धपातळीवर

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील बोगदा क्रमांक ४० परिसरात भूस्खलन झाल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. रेल्वे प्रशासनाकडून माती आणि दगड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, मार्ग लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सकाळी अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले

बोरघाटातील भूस्खलनामुळे सकाळी मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील तिन्ही रेल्वे मार्ग प्रभावित झाले. त्यामुळे इंद्रायणी एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस, धुळे एक्स्प्रेस यांसह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले, तर काही गाड्या नियोजित स्थानकापूर्वीच थांबविण्यात आल्या.

पुणेहून मुंबईकडे प्रवास टाळण्याचे आवाहन

पुणे वाहतूक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवाजी पवार यांनी नागरिकांना पुणेहून मुंबईकडे अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. 'मिसिंग लिंक' परिसरातील परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून सातत्याने आढावा घेतला जात असून, रस्ता पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.

मुंबईसाठी रेड अलर्ट कायम

दरम्यान, मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम असून, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) रेड अलर्ट कायम ठेवला आहे. शहरात ताशी ६० ते ७० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

२४ तासांत विक्रमी पावसाची नोंद

गेल्या २४ तासांत मुंबई शहरात सरासरी १०५.२४ मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरात १६१.११ मिमी, तर पश्चिम उपनगरात १५९.४० मिमी पाऊस झाला आहे.

कुलाब्यात झाड कोसळले

मुसळधार पावसामुळे कुलाबा परिसरात मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून झाड हटविण्याचे काम हाती घेतले.

पालघर, वसई-विरारमध्येही गंभीर परिस्थिती

पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, पालघरमध्ये अवघ्या दोन तासांत ३०० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने गाड्या कमी वेगाने धावत असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा हेल्पलाइनवरून गाड्यांची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Rain : मुसळधार पावसाचा धोका वाढला; खासगी कंपन्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'च्या सूचना, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे

Mumbai Rain : मुंबईसाठी रेड अलर्ट! ताशी ९० किमी वेगाने वादळी वारे; अतिवृष्टीचा इशारा, १५ हजार कर्मचारी तैनात

मुंबईत पावसाचा कहर! पूरस्थितीत उपयोगी ठरणार 'हे' ६ अ‍ॅप्स, रिअल-टाइम अलर्टपासून लोकल अपडेट्सपर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर

Mumbai : फुटपाथवर आता कमी उंचीची सावली देणारी झाडे; BMC देणार उद्यान विभागाला धडे

वारकऱ्यांसाठी प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती