छाय सौजन्य : X | @airnews_mumbai
महाराष्ट्र

‘इंद्रधनुष्य’वर पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाची विजयी पताका; २१ वर्षांच्या कारकीर्दीमध्ये तब्बल २० वेळा विजयाचा बहुमान

राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’मध्ये राज्यातील २३ विद्यापीठे सहभागी झाली होती. ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे हा महोत्सव पार पडला.

Krantee V. Kale

मुंबई : २१ व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’मध्ये मुंबई विद्यापीठाने पुन्हा एकदा प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपद पटकावले आहे. मुंबई विद्यापीठाने स्पर्धेच्या २१ वर्षाच्या कारकीर्दीमध्ये तब्बल २० वेळा अंतिम सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक आपल्याकडे राखण्याचा बहुमान मिळविला आहे. विद्यापीठाने ६ सुवर्ण, १० रौप्य आणि १ कांस्यपदकांची कमाई करत चमकदार कामगिरी केली आहे.

राज भवनद्वारे आयोजित राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’मध्ये राज्यातील २३ विद्यापीठे सहभागी झाली होती. ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे हा महोत्सव पार पडला. संगीत, साहित्य, नृत्य आणि नाट्य या गटांतील स्पर्धांमध्ये विजयी सलामी देत सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने १११ गुणांची कमाई करत सर्वसाधारण विजेतेपद मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय शास्रीय गायन, भारतीय समूह गायन, पाश्चिमात्य समूह गायन, पाश्चिमात्य एकल गायन, पाश्चिमात्य वाद्यवादन आणि मूकनाट्य या विभागातील स्पर्धांमध्ये ६ सुवर्णपदके मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. यासोबत भारतीय शास्त्रीय तालवाद्य, लोकवाद्यवृंद, नाट्य संगीत, भारतीय शास्रीय नृत्य, भारतीय लोक नृत्य, एकांकिका, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, वादविवाद आणि छायाचित्रण या स्पर्धांमध्ये १० रौप्यपदकांचा बहुमान मिळवला तर भित्तीपत्र स्पर्धेत १ कांस्यपदक मिळाले.

निधी खाडीलकर आणि या हर्ष नकाशे या विद्यार्थ्यांनी ‘गोल्डन गर्ल’ आणि ‘गोल्डन बॉय’चा किताब मिळवला. या स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणून तुषार शिरसाठ, मयूर मगरे, केशर चोपडेकर, विलास रहाटे, आशिष पवार, साहिल जोशी, सागर चव्हाण, महेश कापरेकर, अभिजित मोहिते, रोहन कोठेकर, अमोल बावकर या सर्वांचे सहकार्य लाभले.

“मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ‘इंद्रधनुष्य’ राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सवात पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व मिळवून विजेतेपदाचा बहुमान मिळवणे हे आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवाची बाब आहे. स्पर्धेच्या २१ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तब्बल २० वेळा अंतिम सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक आपल्याकडे राखण्याचा बहुमान मिळविणे हे एक मोठ्या परंपरेचा भाग असून ती आमच्या विद्यापीठाच्या सांस्कृतिक समृद्धीची साक्ष देणारी आहे." - प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

Mumbai : सँडहर्स्ट रोड रेल्वे दुर्घटनेला जबाबदार कोण? ५ दिवस उलटले तरी FIR नाही

मुंब्रामध्ये ATS ची मोठी कारवाई; शिक्षकाच्या घरावर छापा, अल-कायदा प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय

सांगलीत हत्येचा थरार! आधी बर्थडे पार्टीत जेवले, मग केले सपासप वार; दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षाचा खून

मुंबईत शुक्रवारी पाणीपुरवठा बंद; कुर्ला, चेंबूर, घाटकोपर व माटुंगा विभागातील काही परिसरांना झळ बसणार

अचानक बेशुद्ध पडल्याने अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल