महाराष्ट्र

होळीला कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-विजयदुर्ग Ro-Ro सेवा उद्यापासून सुरू; जाणून घ्या वेळापत्रक आणि तिकीट दर

Ro-Ro सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना त्यांच्या वाहनांसह प्रवास करता येणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी ही सेवा अधिक सोयीची ठरणार आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई आणि कोकणातील विजयदुर्ग यांना जोडणारी बहुप्रतिक्षित रोल-ऑन/रोल-ऑफ (Ro-Ro) फेरी सेवा अखेर १ मार्च २०२६ पासून सुरू होत आहे. महाराष्ट्र सागरी मंडळ आणि M2M Ferries यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होणारी ही सेवा कोकणातील जलवाहतुकीसाठी महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. या सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना अवघ्या ६ ते ७ तासांत मुंबईहून विजयदुर्ग गाठता येणार आहे.

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या सेवेचा शुभारंभ करत M2M Ferries संचलित Ro-Ro जहाजासाठी प्रतीकात्मकरीत्या पहिले तिकीट बुक केले. कोकणातील जलवाहतूक सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. यामुळे कोकणातील नागरिक आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

भाऊचा धक्का ते विजयदुर्ग दरम्यान नियमित फेऱ्या

या सेवेसाठी 'एम टू एम प्रिन्सेस' ही आधुनिक Ro-Ro बोट वापरण्यात येणार आहे. ही बोट मुंबईतील भाऊचा धक्का येथून सुटून विजयदुर्ग जेट्टीपर्यंत धावेल

Ro-Ro सेवेचे वेळापत्रक

जाहीर वेळापत्रकानुसार,

  • १ मार्च रोजी सकाळी ८ वाजता मुंबई पोर्टवरून फेरी सुटेल आणि दुपारी ३ वाजता विजयदुर्ग येथे पोहोचेल.

  • परतीचा प्रवास २ मार्च रोजी दुपारी १२ वाजता विजयदुर्गवरून सुरू होऊन सायंकाळी ७ वाजता मुंबईत पोहोचेल.

नियमित फेऱ्या:

  • मुंबई ते विजयदुर्ग : प्रत्येक बुधवार आणि शनिवार सकाळी ८ वाजता सुटणार, दुपारी सुमारे २ ते ३ वाजता विजयदुर्गला पोहोचणार

  • विजयदुर्ग ते मुंबई : प्रत्येक गुरुवार आणि रविवार दुपारी १२ वाजता सुटणार, सायंकाळी ६ ते ७ वाजता मुंबईत पोहोचणार

मार्च महिन्यात एकूण १६ फेऱ्या

  • मुंबई ते विजयदुर्ग सेवा : १, ४, ७, ११, १४, १८, २१ आणि २५ मार्च

  • विजयदुर्ग ते मुंबई सेवा : २, ५, ८, १२, १५, १९, २२ आणि २६ मार्च

सुरुवातीच्या टप्प्यात प्रवाशांचा प्रतिसाद आणि कार्यक्षमतेचा आढावा घेण्यासाठी टप्प्याटप्प्याने वेळापत्रक आखण्यात आले आहे.

वाहनांसह प्रवासाची सुविधा

Ro-Ro सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांना त्यांच्या वाहनांसह प्रवास करता येणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी ही सेवा अधिक सोयीची ठरणार आहे.

पूर्वी सेवा रखडली, आता अखेर मुहूर्त

ही सेवा ऑगस्ट २०२५ मध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र तांत्रिक अडचणी, सुरक्षा तपासणी आणि आवश्यक परवानग्यांमधील विलंबामुळे सेवा सुरू होऊ शकली नव्हती. तसेच पूर्वीच्या एका अपघातानंतर सुरक्षा पुनरावलोकनासाठी सेवा स्थगित करण्यात आली होती. आता सर्व आवश्यक पायाभूत सुविधा, जेट्टीचे काम आणि चाचण्या पूर्ण झाल्यानंतर अखेर १ मार्चपासून सेवा सुरू होत आहे.

पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना

या सेवेचा कोकणातील पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. पर्यटकांना सहज आणि जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने कोकणातील पर्यटनस्थळांना अधिक पर्यटक भेट देतील. तसेच स्थानिक व्यवसाय, हॉटेल्स आणि पर्यटनाशी संबंधित उद्योगांनाही याचा लाभ होणार आहे.

तिकीट दर

मुंबई-विजयदुर्ग Ro-Ro सेवेचे प्रस्तावित दर पुढीलप्रमाणे:

प्रवासी वर्ग:

  • इकॉनॉमी : ₹२,५००

  • प्रीमियम इकॉनॉमी : ₹४,०००

  • बिझनेस : ₹७,५००

  • प्रथम श्रेणी : ₹९,०००

वाहनांसाठी दर:

  • चारचाकी (स्मॉल ते एक्स्ट्रालार्ज) : ₹६,००० ते ₹९,०००

  • दुचाकी : ₹१,०००

  • सायकल : ₹६००

प्रवाशांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा विचार करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई-विजयदुर्ग Ro-Ro सेवा सुरू झाल्यामुळे कोकणातील जलवाहतुकीला नवे बळ मिळणार असून भविष्यात या मार्गावरील जलप्रवास अधिक लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.

इराणच्या राजधानीवर इस्रायलचा क्षेपणास्त्र हल्ला; आणीबाणी जाहीर, भारतीय नागरिकांना दूतावासाचा इशारा

"तो भारदस्त आवाज पुन्हा…"; अजित पवारांच्या निधनाला महिना पूर्ण; दादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंसह पवार कुटुंबीयांच्या भावनिक पोस्ट

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; मुख्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक

वाहतूकदारांचा 'महाराष्ट्र बंद'चा इशारा; ५ मार्चला १ लाख वाहनांसह 'चलो आझाद मैदान'; ई-चलन व जाचक अटींविरोधात आरपारचा लढा

Navi Mumbai : सिडको गृहनिर्माण योजनेला गुढीपाडव्यापर्यंत मुदतवाढ; घर निवडीसाठी १९ मार्चपर्यंत संधी