मुरूड आगारात CNG गॅस पंप होणार नाही; सर्वेक्षणानंतर निर्णय; प्रवाशांत नाराजी प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

मुरूड आगारात CNG गॅस पंप होणार नाही; सर्वेक्षणानंतर निर्णय; प्रवाशांत नाराजी

मुरूड एसटी आगारात सीएनजी गॅस पंप उभारण्याचा प्रस्ताव अखेर नामंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणानंतर गॅस कंपनीने नकारात्मक अहवाल दिल्यामुळे मुरूड आगारात सीएनजी पंप होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रवासी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Swapnil S

मुरूड-जंजिरा : मुरूड एसटी आगारात सीएनजी गॅस पंप उभारण्याचा प्रस्ताव अखेर नामंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणानंतर गॅस कंपनीने नकारात्मक अहवाल दिल्यामुळे मुरूड आगारात सीएनजी पंप होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रवासी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सध्या मुरूड आगारात सीएनजी गॅस पंप उपलब्ध नसल्याने मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेसना अलिबाग किंवा इतर ठिकाणी जाऊन गॅस भरावा लागतो. यामुळे बससेवेच्या वेळापत्रकात अडथळे निर्माण होतात आणि बसेस नियोजित वेळेत पोहचत नसल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मुरूड आगाराला सीएनजी पंप देण्याबाबत सूचना करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सर्वेक्षणही केले; मात्र अहवाल नकारात्मक आल्याने प्रस्ताव फेटाळण्यात आला.

मुरूड आगारात सध्या ७ नवीन बसेस वगळता उर्वरित सुमारे ३० बसेस सीएनजीवर धावत आहेत. गॅस भरण्यासाठी अलिबाग येथे जावे लागत असल्याने वेळेचे नियोजन करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी असंख्य प्रवाशांना ताटकळत बसावे लागते.

या संदर्भात पेण येथील विभाग नियंत्रक चौरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मुरूड आगाराच्या सीएनजी पंपासाठीचा प्रस्ताव महानगर गॅस लिमिटेडकडे पाठविण्यात आला होता. मात्र केवळ ३० गाड्यांसाठी स्वतंत्र पंप देणे शक्य नसल्याचे कारण देत कंपनीने प्रस्ताव नामंजूर केला.

दरम्यान, मुरूड तालुक्यात केवळ एसटी बसेसच नव्हे तर अनेक खासगी वाहनेही सीएनजीवर धावत असल्याने गॅस कंपनीने संपूर्ण तालुक्याचा विचार करणे आवश्यक असल्याचे मत प्रवासी वर्गाने व्यक्त केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सुनील तटकरे यांच्या प्रयत्नांतून सीएनजी पंपासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. मुरूड आगारात पंप होणार नसल्याबाबत कोणतेही अधिकृत पत्र अद्याप प्राप्त झालेले नाही. मात्र जर प्रस्ताव नामंजूर झाला असेल, तर लवकरच खासदारांची भेट घेऊन पंप सुरू होण्यासाठी प्रयत्न केले जातील.
आराधना मंगेश दांडेकर, नगराध्यक्षा मुरूड नगरपरिषद

तीन रखडलेले पूल ऑक्टोबर महिन्यात सेवेत; सायन पुलाची डेडलाइन पुन्हा हुकली, विद्याविहार गोरेगाव-चित्रनगरी उड्डाणपूल अंतिम टप्यात

Thane : एसटीचे 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' आता ऑनलाइन; चार आणि सात दिवसांचे पास घरबसल्या काढता येणार

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणी सत्ताधारी -विरोधक आमने-सामने; निष्पक्ष तपासाची आरोप-प्रत्यारोपांना धार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार