मुंबई : समाजाच्या विविध घटकांकडून सततच्या धमक्या येऊ लागल्याने महाराष्ट्रातील मुस्लीम समाज धास्तावला असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी आज दिली.
सपा नेते अबू आझमी यांनी दैनिक ‘नवशक्ति’च्या कार्यालयाला गुरुवारी भेट देऊन ‘नवशक्ति व फ्री प्रेस जर्नल’चे संचालक अभिषेक कर्नानी यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. ते म्हणाले की, सध्या मुंबईसह देशातील वातावरण फारच कलूषित झाले आहे. मुस्लीम बांधवांच्या मुलांना शाळेत धमकावले जात आहे. काही नेते मंडळी तर खुलेआम मशिदीत घुसून मुस्लिमांना वेचून मारण्याची भाषा करीत आहेत. रेल्वेच्या डब्यात घुसून मुस्लिमांना वेचून मारले जात आहे. दुसरीकडे जे हिंदू-मुस्लीम वाद भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. कारण, पोलिसांवर दबाव आहे. मुस्लीम समाजाला शांतता व सलोखा हवा आहे. हिंदू-मुस्लीम समाजाने एकत्र येऊन उत्सव साजरे करायला हवेत. गुण्यागोविंदाने एकत्र राहायला हवे. तथापि, काही लोक वादग्रस्त वक्तव्ये करून, प्रक्षोभक कृती करून समाजात तेढ निर्माण करीत आहेत. सलोख्यात बाधा आणीत आहेत. म्हणूनच धर्मनिरपेक्ष मतांची मतविभागणी होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
अखिलेश प्रचाराला येणार
आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच सत्तेवर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘राज्य विधानसभेच्या निवडणुकीत मानखुर्द, अणुशक्तिनगर, भायखळा, भिवंडी, नागपाडा, उमरखाडी, मालेगाव, धुळे, औरंगाबादसह जवळपास बारा जागांसाठी आम्ही आग्रही आहोत. पण, १२ जागा मिळाल्या नाहीत तरी मविआची साथ सोडणार नाही. आमच्या प्रचारसभांना समाजवादी पार्टीचे नेते व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवसुद्धा येणार आहेत. मुस्लीम उमेदवारांना मुस्लिमांविरुद्ध उभे करून त्यांना परस्परांमध्ये लढविण्याचे प्रयत्न चालले आहेत. ते लक्षात घेता, या निवडणुकीत मुंबईसह राज्यातील जनतेने ‘मतफोड्यां’पासून चार हात लांब राहायला हवे.
अमली पदार्थांचा वाढता धोका
मुंबईसह राज्यातील अमली पदार्थाच्या वाढत्या धोक्याविषयी आपण राज्य विधानसभेत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. त्यास राज्य सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपली तरुण पिढी आज व्यसनाधीन होत चालली आहे. त्याकडे तितक्याच गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी बेरोजगारी आहे, झोपडपट्ट्या आहेत, तिथे गुन्हेगारीचे प्रमाण अधिक असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
राज्यावरील कर्जाचा बोजा वाढतोय
राज्यासह देशावरील कर्जाचा बोजा वाढतोय. लाडकी बहीण योजनेसारख्या लोकानुनय करणाऱ्या योजनांमुळे राज्यावरील कर्ज वाढत जाण्याची शक्यता आहे. सर्वात जास्त वीज दर महाराष्ट्रात आहे. आमदारांच्या निधीवाटपातही पक्षपात केला जात आहे. एकंदरीत ‘अंधेर नगरी चौपट राजा’ अशी स्थिती बनली असल्याचे त्यांनी सांगितले.