महाराष्ट्र

"त्यांना म्हणावं २८८ पैकी ४०० जागा जिंका..." बावनकुळेंच्या दाव्याची संजय राऊतांनी उडवली खिल्ली

त्यांनी अजून कितीही इंजिन लावली, तरी कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक जिंकणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Suraj Sakunde

मुंबई: महायुती विधासभा निवडणूकीत पावणे दोनशे जागा जिंकेल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. बावनकुळे यांच्या या दाव्याची शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज खिल्ली उडवली. पावणे दोनशे नको, विधानसभेत २८८ जागा आहेत, तुम्ही ४०० पार जागा जिंका, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

त्यांना म्हणावं २८८ पैकी ४०० जागा जिंका...

चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती विधानसभेच्या पावणे दोनशे जागा जिंकेल, या वक्तव्यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले की, "त्यांचा पक्ष आहे. पूर्वी डबल इंजिनवाला पक्ष होता, त्यानंतर शिंदे आल्यावर डबल इंजिन झालं. त्यानंतर अजित दादा आल्यावर ट्रिपल इंजिन झाले. राज ठाकरे आल्यावर चार इंजिन झाली. आता पाच-सहा इंजिनवाला पक्ष आहे. ही सगळी इंजिन बंद करून महाविकास आघाडी पुढे चालली आहे. त्यांनी अजून कितीही इंजिन लावली, तरी कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक जिंकणार. त्यांनी पावणे दोनशे जागा नको त्यांनी कमीत कमी साडे तीनशे जागा जिंकायला हव्यात. महाराष्ट्रात नरेंद्र मोदींचा चारशे पारचा नारा त्यांना पूर्ण करता आला नाही. महाराष्ट्रात २८८ जागा असल्या तरी त्यांनी ४०० पार जागा जिंकाव्या."

वारकऱ्यांनी तुमचं अनुदान नाकारलं....

संजय राऊत म्हणाले की,"या सरकारला माणसं विकत घेण्याचं व्यसन आहे. मत विकत घ्यायचे, अधिकारी, सत्ता, आमदार, खासदार विकत घ्यायचे. त्यांच्याकडे चोरीचे पैसे आहेत. पण या चोरीच्या पैशातून काल वारकरी संप्रदायाला विकत घेण्याचा प्रयत्न झाला. वारकऱ्यांनी तुमच्याकडे पैसे मागितले होते का? वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपये दिले म्हणून तुमच्यावर टीका झाली. म्हणून तुम्ही वारकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न करताय. पण वारकऱ्यांनी तुमचं अनुदान नाकारलं, त्याबद्दल त्यांच्या स्वाभिमानाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे."

भुजबळांच्या भूमिका शिवसेनेच्या भूमिकेशी मेळ खात नाहीत...

छगन भुजबळ शिवसेना ठाकरे गटात येणार अशी चर्चा कालपासून सुरु होती, यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "छगन भुजबळ एकेकाळी शिवसेनेत होते, तेव्हा खूप मोठे नेते होते. आमचेही नेते होते. ते कोणत्याही एका पक्षात टिकून राहिले असते, तर नक्की मुख्यमंत्री बनले असते. छगन भुजबळ यांचा मोठा प्रवास आहे. त्यांच्या प्रवासात शिवसेना खूप मागे राहिली आहे आणि राजकीय प्रवासात शिवसेना खूप पुढे गेली आहे. छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा राजकीय संवाद नाही आणि होण्याची शक्यताही नाही. कारण त्यांनी स्वतःचा एक मार्ग निवडला आहे. त्यांच्या काही भूमिका आहेत. त्या भूमिकांशी शिवसेनेच्या भूमिका मेळ खात नाहीत. अशा प्रकारच्या बातम्या पेरून राजकीयदृष्या गोंधळ उडवून देण्याचा प्रयत्न आहे. छगन भुजबळांना आमच्यापैकी कुणीही भेटलं नाही."

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक