झटपट गोरे होण्याचा नाद जीवावर; नागपुरात पाकिस्तानी क्रीममुळे महिलांना किडनीचे विकार; संभाजीनगरनंतर FDA ची मोठी कारवाई 
महाराष्ट्र

झटपट गोरे होण्याचा नाद जीवावर; नागपुरात पाकिस्तानी क्रीममुळे महिलांना किडनीचे विकार; संभाजीनगरनंतर FDA ची मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगरनंतर आता उपराजधानी नागपूरमध्येही 'पाकिस्तानी ब्युटी क्रीम'च्या वापरामुळे अनेक महिलांना किडनीचे गंभीर आजार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावरील रील आणि जाहिरातींना बळी पडून झटपट गोरे होण्यासाठी वापरण्यात येणारी ही क्रीम आता महिलांसाठी 'स्लो पॉयझन' ठरत आहे.

Swapnil S

नागपूर : छत्रपती संभाजीनगरनंतर आता उपराजधानी नागपूरमध्येही 'पाकिस्तानी ब्युटी क्रीम'च्या वापरामुळे अनेक महिलांना किडनीचे गंभीर आजार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावरील रील आणि जाहिरातींना बळी पडून झटपट गोरे होण्यासाठी वापरण्यात येणारी ही क्रीम आता महिलांसाठी 'स्लो पॉयझन' ठरत आहे. नागपुरातील एकाच रुग्णालयात गेल्या दोन वर्षांत तब्बल १८ महिलांना या क्रीममुळे किडनीचे आजार जडल्याचे डॉक्टरांच्या निदानातून स्पष्ट झाले आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, पाकिस्तान निर्मित या क्रीम्समध्ये ‘पारा’ या धातूची मात्रा प्रमाणाबाहेर असते.

जेव्हा ही क्रीम चेहऱ्यावर लावली जाते, तेव्हा त्यातील मर्क्युरी त्वचेच्या छिद्रांमधून शरीरात प्रवेश करतो. शरीरात गेलेला हा घातक घटक थेट रक्तात मिसळतो. रक्तातील हे विष फिल्टर करताना किडनीवर अतिरिक्त ताण येतो आणि कालांतराने किडनी निकामी होण्यासारखे गंभीर विकार उद्भवतात.

अन्न-औषध प्रशासनाची मोठी कारवाई

नागपूर शहरात या क्रीम्सची खुलेआम विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच 'एफडीए'ने (अन्न व औषध प्रशासन) शोधमोहीम राबवली. मार्केटमधून या क्रीम्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या कारवाईत मल्लिका, झलक, गोरे, गोल्डन पर्ल, चांदणी, उजूबा, फेस फ्रेश, नूर हर्बल, न्यू फेस ब्युटी क्रीम यांसह विविध पाकिस्तानी क्रीम्स जप्त करण्यात आल्या. तसेच पारले गोल्ड, गोरे साबण आणि मल्लिका व्हिटॅमिन-C सिरम यांचाही समावेश आहे.

रीलच्या नादी न लागण्याचा तज्ज्ञांचा इशारा

अनेक तरुण-तरुणी सोशल मीडियावरील 'इन्स्टंट फेअरनेस'चे दावे पाहून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या क्रीम्स वापरतात. ‘चेहऱ्यावर चकाकी आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या क्रीम्स प्रत्यक्षात शरीराच्या अंतर्गत अवयवांना पोखरत आहेत. नागरिकांनी लेबल न वाचता किंवा बनावट विदेशी बनावटीची उत्पादने वापरणे टाळावे. अशा क्रीम्स वापरून कोणीही कायमस्वरूपी गोरे होऊ शकत नाही. उलट, त्यामुळे त्वचेचा कर्करोग आणि किडनी निकामी होण्याचा धोका १०० टक्के असतो,’ असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

नागरिकांसमोर मोठा प्रश्न

गोरं होण्याच्या हव्यासापोटी नागरिक स्वतःच्या आरोग्याशी खेळ करताहेत का, असा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे. या क्रीम्सचा वापर करणाऱ्या काही तरुण-तरुणींनी आरोग्य बिघडल्याचा दावा केला आहे. गोरे होण्याच्या नादात वापरलेल्या या क्रीम्समुळे त्वचेवरच नाही तर थेट किडनीवरही परिणाम होत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.

महाराष्ट्र दिनापासून 'मुंबई अगेन्स्ट ड्रग्ज' मोहीम; नशामुक्त मुंबईसाठी जनजागृतीवर भर; मुंबई उपनगरचे पालकमंत्री आक्रमक

उन्हाळी सुट्टीसाठी एसटी सज्ज; ठाणे विभागात ४९९ बसफेऱ्यांचे नियोजन

सत्र न्यायालयासाठी जव्हारचा पाठपुरावा; मुंबई उच्च न्यायालयात प्रस्ताव सादर

रिक्षाचालकांना मराठी बोलता आलीच पाहिजे! मराठी सक्तीवर परिवहन मंत्री ठाम; १ मेपासून मोहीम होणार सुरू

जात प्रमाणपत्रावरून सुरू असलेला वाद हे विरोधकांचे षडयंत्र; MIM नगरसेविकेच्या वडिलांचा आरोप