नागपूर : नागपूर जिल्ह्यात एका कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती, पत्नी आणि त्यांच्या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली.
हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्धा रोडवरील गवसी मानापूरजवळ शनिवारी रात्री हा अपघात घडला. पती, पत्नी आणि त्यांची दोन मुले मोटारसायकलवरून प्रवास करत असताना मागून येणाऱ्या कंटेनरने त्यांना धडक दिली. ज्यामुळे चौघेही जण रस्त्यावर फेकले गेले.
पती, पत्नी आणि त्यांच्या एका मुलाला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच मृत पावले. दुसरा सहा वर्षांचा मुलगा जखमी अवस्थेत बचावला असून त्याला उपचारासाठी तातडीने खापरी येथील रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात मृत पावलेल्यांची ओळख योगेश नाईक (३५), सुनीता योगेश नाईक आणि गुलशन ऊर्फ गोलू योगेश नाईक (४) अशी पटली आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.